अभिनेता इशान खट्टरने त्याचं बालपण आणि त्याच्या पालकांच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलंय. आपल्या जीवनातील अनुभवांनी आपल्याला अनेक प्रकारे बदललं. लहानपणी घडलेल्या अनेक घटनांबद्दल कुणालाच माहिती नाही. पण एकल पालकांबरोबर वाढताना आलेल्या अनुभवांचा आपल्याला अभिमान आहे, असं इशान म्हणाला. इशान हा अभिनेता राजेश खट्टर आणि निलिमा अझीम यांचा मुलगा आहे. तो अभिनेता शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे.
हेही वाचा – “कोण म्हणतं माझे चित्रपट ओटीटीवर…” नवाजुद्दीन सिद्दिकीने दिला अफवांना पूर्णविराम
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत इशानला आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल विचारण्यात आलं, त्यावर तो म्हणाला, “पालकांचा घटस्फोट झाला, तेव्हा मला एक मोठा भाऊ (शाहिद कपूर) होता. त्यावेळी मी नऊ किंवा 10 वर्षांचा होतो, तेव्हा त्याने स्वतःसाठी चांगलं काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्याने त्याला जमेल तसं माझी आणि माझ्या जवळच्या लोकांची काळजी घेतली होती. माझ्या संगोपनाबद्दल मला कोणतीही तक्रार नाही. मी जे बालपण जगलो त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि मला वाटतं की मी आज जी व्यक्ती आहे ती मी जे पाहिलं आणि त्यातून मी जे घडलो त्यामुळे आहे. लोक ज्या गोष्टी कुठेतरी वाचून किंवा बघून माहिती करून घेतात, त्या गोष्टी मी प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. बर्याच लोकांना वाटतं की त्यांना माझी कहाणी माहीत आहे, पण ज्या परिस्थितीत मी वाढलो, त्याबद्दल कोणालाही माहीत नाही.”
हेही वाचा – “आपल्या समाजात…”, चित्रपटांमुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांवर नीना गुप्तांनी मांडलं मत
तो पुढे म्हणाला, “मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे, मी आयुष्यात बऱ्याच गोष्टी अनुभवताना मी पाहिलंय. ती सक्षम आणि हिंमत असलेली स्त्री आहे. मी तिला सर्व समस्यांवर मात करताना पाहिलंय, त्यामुळे मला तिचा खूप आदर वाटतो. माझी आई राणी आहे आणि ती चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहे. मी कोण आहे, मी कसा घडलो, याचा मला अभिमान आहे. आज मी आव्हानं स्वीकारू शकतो. मी जगायला घाबरत नाही, कोणी काही बोलल्याने मी घाबरत नाही, कारण मी लहानपणापासून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. मी असे दिवस पाहिलेत किंवा मी अशा परिस्थितीत राहिलोय, हे सांगायला मला आवडत नाही,” असंही इशान म्हणाला.