Jaat Actors booked for hurting religious sentiments : अभिनेता सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट वादात अडकला आहे. पंजाबच्या जालंधरमध्ये पोलिसांनी गुरुवारी रात्री सनी देओल, रणदीप हुडा, अभिनेता विनीत कुमार सिंह, दिग्दर्शक गोपीचंद आणि निर्माते नवीन मालिनेनी यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. ‘जाट’ चित्रपटाविरोधात ख्रिश्चन समुदायातील काही लोकांनी आंदोलन केल्यानंतर एफआयर नोंदवण्यात आला आहे.

सदर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ (जाणीवपूर्वक एखाद्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करणे, धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुरुवातीला, पोलिसांनी तक्रारीचे पुनरावलोकन करण्यासाठी दोन दिवस मागितले होते. त्यानंतर त्यांनी एफआयआर नोंदवून घेतला. स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) संजीव कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तक्रारीत नाव असलेल्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे आणि पुढील तपास करत आहेत. तपासानुसार कारवाई केली जाईल.

ख्रिश्चन समुदायाचा आक्षेप नेमका काय?

१० एप्रिल रोजी सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यात सनी देओल मुख्य भूमिकेत तर रणदीप हुड्डा नकारात्मक भूमिकेत आहे. या चित्रपटात तो राणा तुंगाच्या भूमिकेत आहे जो स्वतःची रावणाशी तुलना करतो. चित्रपटातील एका दृश्यात राणा तुंगा चर्चमध्ये जातो आणि येशू ख्रिस्ताच्या जागी उभा राहतो, तो तेथील क्रॉसचाही गैरवापर करतो, ज्यामुळे ख्रिश्चन समुदायाने नाराजी व्यक्त करत आंदोलन केलं आहे. त्यांनी या चित्रपटाला विरोध केला असून आता एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जालंधरमधील सदर पोलीस ठाण्यात जाट अभिनेता सनी देओल, रणदीप हुडा यांच्यासह विनीत कुमार सिंग, दिग्दर्शक गोपी चंद मालिनेनी आणि निर्माता नवीन मालिनेनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाटमध्ये येशू ख्रिस्तांचा व ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक प्रथांचा अनादर करणारी दृश्ये असल्याचा आरोप ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांनी केला आहे.

समुदायाचे नेते विक्लाव गोल्डी यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटातील एका दृश्यात रणदीप हुडा चर्चमध्ये येशू ख्रिस्तासारखा उभा राहतो, त्यावर आक्षेप असून यासंदर्भात जालंधर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी जाट चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.