Jaat Box Office Collection Day 3: बॉलीवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सनी देओल. आजवरच्या करिअरमध्ये सनी देओलने केलेल्या बऱ्याच चित्रपटातील भूमिका सुपरहिट झाल्या. त्याचे बरेच डायलॉग अजूनही सिनेप्रेमींना पाठ आहेत. अलीकडेच सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दोन वर्षांनंतर सनीने ‘जाट’च्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं आहे. १० एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबत समीक्षकांनी आणि चाहत्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जरी बॉक्स ऑफिसवर ‘जाट’ चित्रपटाची संथ गतीने सुरुवात झाली असली तरी वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होताना दिसत आहे. प्रदर्शानंतरच्या पहिल्या शनिवारी सनी देओलच्या चित्रपटाने चांगली कमाई केल्याचं समोर आलं आहे.
‘जाट’ चित्रपटात पुन्हा एकदा सनी देओलचा ‘गदर’मधील अंदाज पाहायला मिळत आहे. १० एप्रिलला, पहिल्या दिवशी ‘जाट’ चित्रपटाने ९.५ कोटींची कमाई केली होती. पण, दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाली. शुक्रवारी ११ एप्रिलला ‘जाट’ चित्रपटाने फक्त ७ कोटींचा गल्ला जमवला. माहितीनुसार, मुंबईतील ‘जाट’ चित्रपटाचे १०० आणि दिल्ली-एनसीआरमधील ३० असे देशाअंतर्गत ४०० हून अधिक शो रद्द केले. याचाच परिणाम ‘जाट’ चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईवर झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, प्रदर्शनानंतरच्या पहिल्या शनिवारी, १२ एप्रिलला सनी देओलच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘जाट’ चित्रपटाने तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १० कोटींची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंत चित्रपटाने २६.५० कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘जाट’ चित्रपटाच्या कमाईत होणारी हळूहळू वाढ पाहता, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. सनी देओलचा हा चित्रपट गोपीचंद मालिनेनी यांनी दिग्दर्शित केला आहे. १०० कोटींमध्ये ‘जाट’ चित्रपट तयार झाला आहे. यामध्ये सनी देओल व्यतिरिक्त रेजिन कॅसेंड्रा, रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंह, राम्या कृष्णन आणि जगपति बाबू यांसारखे बरेच कलाकार मंडळी झळकले आहेत.
दरम्यान, ‘जाट’ चित्रपटातील बरेच सीन कापण्यात आले आहेत. एकूण २२ बदल करण्यात आले आहेत. यामध्ये शिव्या, अपशब्दांसह बरेच हिंसक सीन्स होते, जे आता बदलण्यात आले आहेत. महिला निरीक्षकाच्या छेडछाडीचे दृश्य देखील हटवून लहान सीन करण्यात आला आहे. असं असलं तरी ‘जाट’ चित्रपटाविषयी सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया चांगल्या उमटल्या आहेत. सनीच्या आजवरच्या करिअरमधील ‘जाट’ चित्रपट सर्वोत्कृष्ट असल्याचं काहींनी सांगितलं आहे. तर काहींनी दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणे ‘जाट’ असल्याचं म्हटलं आहे.