अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. जॅकलिन मूळची श्रीलंकेची असली तरी भारतात तिनं तिच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग असल्याचेही पाहायला मिळते. तर, लवकरच जॅकलिन काही नवीन चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. जॅकलिननं नुकतंच मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं असून, यावेळी दर्शनासाठी ती एकटी नसून, तिच्यासह एलॉन मस्क यांच्या आईदेखील तेथे उपस्थिती होत्या.

जॅकलिननं या वेळचं इस्टर हे वेगळ्या पद्धतीनं साजरं केलं असून, या वर्षी सिद्धिविनायक मंदिरात तिनं गणपती बाप्पाचं दर्शन घेत हा दिवस साजरा केला. महत्त्वाचं म्हणजे तिच्यासह एलॉन मस्क यांच्या आई मये मस्क (maye musk) दर्शन घेताना दिसल्या. जॅकलिननं सिद्धिविनायक मंदिरातला माझा अनुभव खूप छान होता, असं म्हणत तिची मैत्रीण मये मस्क भारतात त्यांच्या पुस्तकाच्या प्रदर्शनासाठी आल्याचं सांगितलं आहे. पुढे ती म्हणाली, “मयेचं पुस्तक हे एका महिलेच्या आनंदी वृत्तीचं प्रतीक आहे आणि त्यातून मी खूप काही शिकली आहे, विशेषतः वय हा फक्त एक आकडा आहे आणि ते तुमची स्वप्नं आणि ध्येयं गाठण्यापासून रोखू शकत नाही”.

तर, मये मस्क काही दिवसांपासून भारतात असून, त्यांनी ‘अ वूमन मेक्स अ प्लॅन’ हे पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाच्या प्रदर्शनासाठी भारतात आलेल्या आई मये मस्कसाठी एलॉन यांनी त्यांना पुष्पगुच्छ पाठवीत त्यांचं अभिनंदन केलं. त्याबाबत स्वत: मये यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत सांगितलं होतं. तर, सध्या त्या जॅकलिनसह सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेताना दिसल्या. तसेच, नुकताच मये यांनी मुंबईत त्यांचा ७७ वा वाढदिवसही साजरा केला.

दरम्यान, जॅकलिन ‘हाऊसफुल ५’ या आगामी चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकलिनसह या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, कीर्ती सेनन, रितेश देशमुख, जॅकी श्रॉफ, अभिषेक बच्चन, जॉन इब्राहिम, शरद केळकर, मिथुन चक्रवर्ती यांसारखी इतर बरीच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.