सध्या सर्वत्र ‘पठाण’ चित्रपटाचा बोलबाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून अनेक चित्रपटगृहांच्या मालकांनी या चित्रपटाचे शोही वाढवले आहेत. शाहरुखच्या चाहत्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आता अशातच अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘पठाण’ न बघता ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ हा चित्रपट पाहिला.
‘पठाण’च्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २६ जानेवारी रोजी ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीमधील भिन्नता दाखवण्यात आली आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटाला मात्र थंड प्रतिसाद मिळताना दिसतोय.
राजकुमार संतोष यांची मुलगी तनिषा संतोषी हिने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तनिषा आणि जान्हवी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. या चित्रपटातील तनिषाच्या अभिनयाचे अनेकांनी खूप कौतुक केले आहे. आता जान्हवीलाही तनिषाचं काम खूप आवडलं आहे. जान्हवीने तिचं आणि या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं.
जान्हवी म्हणाली, “मी तनिषाला लहानपणापासून ओळखते. पण मी कधीही तिचा अभिनयातील प्रवास पाहिला नव्हता. तिच्या अभिनयात एक प्रकारचा साधेपणा आहे. ती जेव्हा स्क्रीनवर येते तेव्हा सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेते. खऱ्या आयुष्यात मात्र ती या भूमिकेपेक्षा अगदी वेगळी आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतो. मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. या चित्रपटात तिने जीव ओतून काम केलं आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकही तिला भरभरून प्रेम देतील.”
हेही वाचा : Pathaan box office collection: चौथ्या दिवशीही सर्वत्र ‘पठाण’चाच डंका, कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ आणि ‘पठाण’ या चित्रपटात सध्या स्पर्धा पाहायला मिळत आहे. ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. नथुराम गोडसे महात्मा गांधींवर गोळ्या झाडतो पण गांधी त्यातून वाचतात आणि नंतर महात्मा गांधी नथुरामला भेटून त्यांच्यात वैचारिक युद्ध रंगतं असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.