शहनाझ गिल सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. शहनाझ गिलला चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याआधीच प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तिचे बरेच व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात यावरून तिच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येऊ शकतो. शहनाझचा एक व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणात चाहत्यांनी जान्हवी कपूरची चांगलीच शाळा घेतली आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये शहनाझ गिल, पूजा हेगडे आणि जान्हवी कपूर एकत्र बसलेल्या दिसत आहेत. यादरम्यान जान्हवी कपूर अभिनेत्री पूजा हेगडेशी खूप बोलताना दिसत आहे. पण, मध्ये बसलेली शहनाझ जेव्हा जान्हवीशी बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा जान्हवी तिच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
आणखी वाचा : ‘कॉफी विथ करण सीझन ८’साठी करण जोहरही आहे उत्सुक; पहिल्या भागात दिसू शकतं ‘हे’ लाडकं जोडपं
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहनाज गिलचे चाहते जान्हवी कपूरला प्रचंड ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले, “जान्हवी शहनाझकडे का दुर्लक्ष करतेय? नेपोकिड्सची वृत्ती बघा.” आणखी एका यूजरने लिहिले की, “बघा, एक दिवस शहनाझ गिल बॉलिवूडवर राज्य करेल.” मात्र, जान्हवी ट्रोल झाल्यावर तिचे काही चाहतेही तिची बाजू घेऊन कॉमेंट करू लागले. एका यूजरने लिहिले की, “शहनाझ फारच ओव्हरअॅक्टिंग करते, जान्हवीने कोणाकडेही दुर्लक्ष केलेले नाही.”
सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मुळे शहनाझ खूप चर्चेत आहे. अलीकडेच शहनाझने हिंदी चित्रपटसृष्टीत सलमानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. मुलाखतीमध्ये शहनाझ म्हणाली होती की, “तो ‘बिग बॉस’च्या मंचावर दिसतो तसाच आहे. मला त्यात काही फरक दिसत नाही. तो इतरांना चांगला सल्ला देतो आणि त्यांना प्रेरणा देतो.” ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या ईदला प्रदर्शित होणार आहे.