अभिनेत्री जान्हवी कपूरने आज आपला २७ वा वाढदिवस तिरुपती मंदिरात दर्शन घेऊन साजरा केला. बॉयफ्रेंड शिखर पहारिया आणि सोशल मीडिया स्टार असलेला तिचा जवळचा मित्र ओरी यांच्यासह जान्हवी तिरुपतीच्या दर्शनासाठी गेली होती.
जान्हवी कपूरने मंदिरात दर्शन घेताना खास दाक्षिणात्य पद्धतीने साडी नेसली होती. पारंपरिक दाक्षिणात्य पेहरावात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय शिखर आणि ओरीदेखील पारंपरिक पोशाख करून मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. या तिघांचा मंदिर परिसरातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जान्हवी आणि शिखर अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्येही एकत्र सहभागी झाले होते. अभिनेत्रीचा देवावर प्रचंड विश्वास व श्रद्धा असल्याने अनेकदा ती कुटुंबीयांसह प्रसिद्ध मंदिरात जाऊन दर्शन घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जान्हवीचा पारंपरिक लूक आणि तिच्या साधेपणाचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
जान्हवीने शिखरबरोबरच्या नात्याबाबत काही महिन्यांपूर्वीच ‘कॉफी विथ करण’मध्ये अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. शिखर पहारियाचं महाराष्ट्राची खास कनेक्शन आहे ते म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा तो नातू आहे. त्यांच्या कन्या स्मृती शिंदे पहारिया यांचा शिखर मोठा मुलगा आहे. शिखरच्या लहान भावाचं नाव वीर असून तो लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
दरम्यान, जान्हवी कपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर येत्या काळात ती ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’, ‘मिस्टर आणि मिसेस माही’, ‘देवरा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.