जावेद अख्तर हे सिनेमासृष्टीतलं असं नाव आहे ज्या नावाशिवाय सिनेमासृष्टीचा इतिहास अपूर्ण आहे. कारण सलीम जावेद या जोडीने केलेली कमाल हिंदी सिनेसृष्टी कधीच विसरु शकत नाही. जावेद अख्तर हे गीतकार, कवी आणि संवाद लेखक आहेत. जावेद अख्तर यांच्यातली लेखनकला त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच निसार अख्तर यांच्याकडून मिळाली. कारण निसार अख्तरही खूप मोठे कवी होते. तर त्यांची आई सफिया अख्तर या प्रसिद्ध उर्दू लेखिका होत्या. घरातलं वातावरण जसं होतं त्याचप्रमाणे जावेद अख्तर घडले. खूप कमी लोकांना ठाऊक आहे की त्यांचं नाव जादू आहे.

जावेद अख्तर यांचं नाव जादू कसं पडलं?

कवी जावेद अख्तर यांचे वडील निसार अख्तर यांनी एक कविता लिहिली होती. त्याची ओळ होती ‘लम्हा लम्हा किसी जादू का फसाना होगा’. यातल्या जादू या शब्दावरुन त्यांचं नाव जादू असं ठेवण्यात आलं होतं. नंतर ते जावेद असं ठेवण्यात आलं कारण ते जादू शब्दाच्या जवळ जाणारं आहे. जावेद अख्तर यांचं X अकाऊंटही @Javedakhtarjadu या नावानेच आहे. जादू हा शब्द आपल्याला या नावातही आढळतो याचं कारण हेच की त्यांचं खरं नाव जादू आहे. जावेद अख्तर जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं.

Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…

स्ट्रगलचे दिवस

जावेद अख्तर हे आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत आले. त्यावेळी त्यांच्याकडे खायलाही पैसे नव्हते. आपण सिनेमाचं दिग्दर्शक व्हायचं हे स्वप्न घेऊन ते मुंबईत आले होते. पण त्यांनी अनेकदा उपाशी राहूनही दिवस काढले आहेत. मुंबईत असे काही दिवस काढल्यानंतर त्यांना कमाल अमरोही यांच्या स्टुडिओत एक जागा मिळाली. तिथे काही काळ जावेद अख्तर क्लॅप बॉय म्हणून काम करत असत. सरहदी लुटेरा या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांची भेट सलीम खान यांच्याशी झाली. कारण सलीम खान हे त्या सिनेमाचे हिरो होते. यानंतर या दोघांची मैत्री झाली. पुढे जो इतिहास घडला तो आपल्याला माहीत आहेच. पण खरंतर जावेद अख्तर यांना लेखक, कवी हे काहीही व्हायचं नव्हतं. त्यांना दिग्दर्शक व्हायचं होतं. तर सलीम खानही अभिनेते होण्यासाठीच मुंबईत आले होते. पण या दोघांना सूर गवसला तो लेखणीतूनच. या दोघांनी २४ चित्रपट केले. त्यातले २२ चित्रपट सुपरडुपर हिट ठरले.

ram sita is god of all indian citizens says veteran lyricist javed akhtar
जावेद अख्तर (संग्रहित छायाचित्र) फोटो- इंडियन एक्स्प्रेस

पहिला पगार १०० रुपये होता

मोहम्मद अली ताक म्हणून होते ज्यांनी एस. एम. सागर यांच्याकडे ओळख काढली आणि जावेद अख्तर यांना नोकरीला ठेवून घ्या सांगितलं. ज्यानंतर १०० रुपये महिना पगारावर जावेद अख्तर एस. एम. सागर यांच्याकडे नोकरी करु लागले. जावेद अख्तर त्या सिनेमात असिस्टंट म्हणून काम करु लागले. मात्र त्या चित्रपटात कुणीही संवाद लिहायला तयार नव्हतं. त्यावेळी जावेद अख्तर त्यांना म्हणाले तुम्ही म्हणत असाल तर या चित्रपटाचे संवाद मी लिहितो. त्यांनी होकार दिल्यावर जावेद अख्तर यांनी संवाद लिहिले. एस. एम. सागर यांना ते आवडले. त्यांच्या घरी सलीम खान येत असत तिथे या दोघांची मैत्री आणखी घट्ट झाली. मात्र एस. एम. सागर यांच्याकडे लेखक म्हणून फार बरी वागणूक मिळत नसे. त्यावेळी जावेद अख्तर वैतागले. त्याबद्दल जावेद अख्तर सांगतात, “मी तेव्हा ठरवलं होतं, आता लिखाण करायचं नाही, सोडून द्यायचं. मात्र सलीम खान यांनी मला सांगितलं जावेद तू लिखाण सोडलंस तर पस्तावशील. तू लिखाण करत राहा. सलीम खान यांच्या घरी मी त्यानंतर जाऊ लागलो. तिथे आम्ही स्क्रिप्टवर काम करु लागलो आणि आमचं लिखाण सुरु झालं” असं जावेद अख्तर यांनी सांगितलं होतं.

पहिल्या सिनेमासाठी मिळाले पाच हजार रुपये

“सलीम खान यांच्या घरी जेव्हा आम्ही बसलो होतो तेव्हा तिथे एस. एम. सागर आले. त्यांनी सांगितलं माझ्याकडे एक कथा आहे पण त्याची पटकथा आणि संवाद मला हवे आहेत. त्यावर आम्ही (सलीम-जावेद) त्यांना विचारलं की आम्ही लिहू शकतो किती पैसे द्याल? ज्यावर सागर म्हणाले मी तुम्हाला ५ हजार रुपये देईन. आमची तर त्या काळात लॉटरीच लागली असं आम्हाला वाटलं. कारण आम्ही पाच हजार रुपये पाहिलेच नव्हते. अधिकार हा तो सिनेमा होता. तो सिनेमा हिट झाला. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सिप्पी फिल्म्समध्ये का जात नाही? मग आम्हाला वाटलं चला तिकडे जाऊन पाहू. तिकडे गेल्यावर मी सांगितलं आम्ही असं लिहितो, आम्ही अशा आयडियाजवर काम करतो. तेव्हा मला थांबवून तिथल्या माणसाने विचारलं की आम्ही म्हणजे काय? त्यावर मी त्यांना सांगितलं आम्ही दोघंही स्क्रिप्टवर काम करतो मी आणि सलीम खान. त्यामुळे सलीम जावेद म्हणून आम्हाला त्यांनी बोलवलं. त्यावेळी सलीम खान यांना विचारलं, जर सिप्पी फिल्म्सने आपल्याला काम दिलं तर पैसे किती मागायचे? त्यावर एक हजार रुपये प्रत्येकी घेऊ. त्यांनी आम्हाला ७५० रुपये महिना प्रत्येकी देण्याचं कबूल केलं आणि नोकरी दिली. अंदाज नावाचा सिनेमा तेव्हा तयार होत होता. मात्र सिनेमा मध्यंतरापर्यंतच तयार होता. पुढे काय करावं सुचत नव्हतं. ते कामही आम्ही केलं” असा किस्सा जावेद अख्तर यांनी सांगितला होता.

राजेश खन्नाचा तो किस्सा

जावेद अख्तर यांनी सांगितलं होतं, “एकदा राजेश खन्ना सलीम खान यांच्याबरोबर भेटायला आला. त्याला सिप्पींनी ब्रेक दिला होता. त्यामुळे रोज यायचा. आम्हाला एक दिवस म्हणाला माझा एक नाईलाज झालाय, मी कार्टर रोडवर घर घेतलं आहे. ते घर साडेचार लाखांचं आहे, तसंच एका सिनेमा निर्मात्याने (चिन्नपा थेवर) इतके पैसे साईनिंग अमाऊंट म्हणून दिलेत जे मी परत करुच शकत नाही. कारण यांनी मला अडीच लाख रुपये दिले आहेत. मी जर त्यांच्या स्क्रिप्टप्रमाणे काम केलं तर मी सिनेमासृष्टीतून बाहेर पडेन अशी भीती मला वाटते आहे. त्यानंतर आम्ही दिग्दर्शक आणि निर्माते यांना सांगितलं हिरो राजेश खन्ना राहिल. चार हत्तीही असतील. यापेक्षा सगळं काही वेगळं असेल. तो सिनेमा होता ‘हाथी मेरे साथी’ आम्ही गंमतीत गंमतीत स्क्रिन प्ले लिहिला. त्यांना तो ऐकवला. त्यावेळी आम्हाला दोघांना १० हजार रुपये मिळाले. त्यानंतर सीता और गीता सिनेमा सुरु झाला होता.” असा किस्सा जावेद अख्तर यांनी सांगितला होता.

Salim Javed
सलीम जावेद यांची जोडी अजरामर जोडी मानली जाते. या दोघांशिवाय बॉलिवूडचा इतिहास अधुरा आहे यात शंका नाही. (फोटो सौजन्य-फेसबुक पेज, जावेद अख्तर)

मी आणि सलीम खान यांनी पार्टनर होऊ असं ठरवलं नव्हतं

सलीम जावेद या सिनेमासृष्टीतल्या हिट जोडीने एकाहून एक सरस सिनेमा दिले. ज्यामध्ये शोले, दिवार, त्रिशूल, जंजीर, यादो की बारात, मजबूर, हात की सफाई, डॉन, शान, क्रांती, शक्ती असे एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. तसंच सिनेमात लेखकाला मान असला पाहिजे त्याला योग्य मानधन मिळालं पाहिजे हेदेखील याचं उदाहरणही या जोडीने ठेवलं. आम्ही कधी ठरवून पार्टनर झालो नाही असंही जावेद अख्तर म्हणाले होते. “आम्ही दोघांनी बसून कधीच ठरवलं नव्हतं की आपण पार्टनर. त्या गोष्टी आपोआप होत गेल्या. ओळख वाढली, मैत्री वाढली विचार जुळले आणि अगदी नैसर्गिकरित्या आम्ही एकत्र आलो. कुठे काहीही ठरवलेलं नव्हतं. सलीम खान यांच्याकडे एक कथा होती. जी धर्मेंद्र यांनी ९ हजार रुपयांना विकत घेतली होती. मात्र प्रकाश मेहरांसाठी आम्ही त्या कथेवर काम केलं. त्यावेळी आम्ही त्या काळातलं सर्वाधिक मानधन घेतलं होतं जे होतं ५५ हजार रुपये. जंजीर हा सिनेमा होता. प्रकाश मेहरा यांनी निर्मिती दिग्दर्शन दोन्ही केलं होतं. पण सिनेमाला हिरो नव्हता. आम्ही जो हिरो त्यात साकारला होता ज्यात तो खूप अतर्क्य वाटेल असं काही करत नाही. आपल्या एका अंदाजात तो फिरत राहतो. मी अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेले परवाना, बॉम्बे टू गोवा हे चित्रपट तेव्हा पाहिले होते. परवाना हा सुपरफ्लॉप सिनेमा होता. पण मला अमिताभ बच्चनचा अभिनय आवडला त्यामुळे प्रकाश मेहरांना सांगितलं तुम्ही या अभिनेत्याला जंजीर मध्ये घ्या. त्यावर ते नाही म्हणाले. त्यांनी ज्यांच्याकडे ही स्क्रिप्ट नेली त्या सगळ्यांनी ही भूमिका करायला नकार दिला. त्यानंतर अखेर त्यांनी अमिताभला जंजीर सिनेमात घेतलं. त्यानंतर आम्हीही प्रकाश झोतात आलो आणि अमिताभही. या सिनेमाने सगळ्या परंपरा मोडल्या होत्या. पण अमिताभचे फ्लॉप चित्रपट आले होते.” असं जावेद अख्तर म्हणाले होते.

सिनेमाच्या पोस्टरवर आणि फलकांवर आमचं नाव झळकलं..

जंजीर सिनेमा आला तेव्हा आम्ही म्हटलं लेखक म्हणून तुम्ही आमचं नावही दिलं पाहिजे पोस्टरवर असं सलीम खान प्रकाश मेहरांना म्हणाले. मीदेखील त्यांना साथ दिली. तर ते म्हणाले लेखक म्हणून तुमचं नाव? असं कधी असतं का? लेखकाचं नाव कुठे पोस्टरवर असतं? असा प्रश्न त्यांनी विचारला. ज्यानंतर सलीम खान यांनी सुरेश नावाच्या एका माणसाला बोलवलं. त्याला दारु प्यायला पैसे दिले. जंजीर सिनेमाचे पोस्टर मुंबईत जिथे लागले आहेत तिथे Written By Salim Javed असं लिहून ये सांगितलं. यासाठी आम्ही कुठलीही परवानगी घेतली नव्हती. रात्रभर त्याने पोस्टरवर आमची नावं लिहिली. सकाळ झाली तेव्हा पोस्टरवर आमची नावं होती. त्यानंतर आमची नावं सिनेमाच्या क्रेडिट लाईनमध्येही येऊ लागली आणि पोस्टरवरही येऊ लागली. तसंच जेव्हा ही गोष्ट घडली त्यानंतर आम्ही ठरवलं की आता २ लाख रुपये मानधन घेतल्याशिवाय सिनेमा करायचा नाही.” असा किस्साही जावेद अख्तर यांनी सांगितला होता.

सलीम जावेद यांनी जेव्हा दोन लाख रुपये मानधन मागितलं तेव्हा आठ महिने काम मिळालं नव्हतं. पण नंतर काम मिळालं. आम्ही त्यावेळी गोष्ट, संवाद, पटकथा हेच सिनेमाचा प्राण असतं हे सांगायचो पण निर्माते ऐकायचे नाहीत. आम्हाला आठ महिने काम मिळालं नाही पण आम्ही आम्हाला आठ महिने काम मिळालं नाही पण दोन लाख रुपयांच्या खाली आम्ही स्क्रिप्ट विकणारच नाही ही अकड आमच्यातही होती..तसं घडलंही आम्हाला तेवढे पैसे मिळाले. असंही जावेद अख्तर यांनी सांगितलं.

शोले सिनेमा एक कोटी कमवणार याची गॅरंटी आम्ही घेतली

शोले हा सलीम जावेद यांच्या लेखणीतून अजरामर झालेला सिनेमा आहे. आजच्या पिढीलाही त्याची भुरळ पडते. त्याबाबत जावेद अख्तर म्हणाले होते, “शोले हा सिनेमा जेव्हा आला त्यानंतर एकच आठवड्यात एका मॅगझीनने शोले का फसला असा मथळा देऊन एक आर्टिकल लिहिलं. यानंतर आम्ही म्हणजेच सलीम जावेद या जोडीने एक मुलाखत दिली आणि हा दावा केला आमचा शोले सिनेमा कमीत कमी एक कोटी रुपये कमवणार. तो काळ असा होता तोपर्यंत एकाही सिनेमाने एक कोटींची कमाई केली नव्हती. पण शोले रिलिज झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात माझ्या घरी एक मिटिंग झाली. जी.पी. सिप्पी, रमेश सिप्पी, अमिताभ बच्चन, सलीम खान सगळे आले. मला सिप्पी म्हणाले चित्रपट रिशूट करु. अमिताभ बच्चन म्हणजेच जयचं पात्र जिवंत ठेवू, तसंच शेवट बदलू. तिसरा असा बदल करु. मी त्यांना विचारलं ‘मेरा गाँव मेरा देश’ सिनेमाने किती कमाई केली? तर ते म्हणाले ५० लाख. मी त्यांना म्हटलं मग आपला चित्रपट एक कोटींची कमाई करेल. त्यावर रमेश सिप्पी म्हणाले की नाही असं नाही होणार. जी.पी. सिप्पीही घाबरले होते. मात्र आम्हाला म्हणजेच मला सलीम खान यांना खात्री होती की सिनेमा एक कोटीचा व्यवसाय तर कमीत कमी करेल. शोलेने इतिहास घडवला हे सगळ्यांना माहीत आहेच.” असं जावेद अख्तर म्हणाले होते.

सलीम जावेद ही जोडी ११ वर्षे एकत्र होती. “यशस्वी सिनेमा देऊन आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो. आम्ही ठरवून एकत्र आलो नव्हतो. मात्र अमाप प्रसिद्धी मिळाल्यानंतर आम्ही वेगळे झालो. कुठलंही नातं हे सुरुवातीच्या काळात फुलत असतं तेव्हा त्यात एक प्रकारचा अल्लडपणा असतो.मात्र वाटा वेगळ्या होणं हे सोपं नव्हतं. कारण आम्ही वेगळे झालो तेव्हा सलीम-जावेद हा एक ब्रांड झाला होता. त्यातून आम्हालाही बाहेर यायला दोन ते तीन वर्षांचा काळ गेला. मात्र जे घडलं त्याचा आम्हाला काहीही पश्चात्ताप असा नाही.” असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं.

जावेद अख्तर आणि सलीम खान हे वेगळे झाल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात गीत लेखन केलं. अगदी मागच्या महिन्यात आलेल्या डंकी सिनेमासाठीही जावेद अख्तर यांनी गीत लेखन केलं. तेजाब, लगान, स्वदेस, डॉन, रॉक ऑन, जिंदगी ना मिलेगी दोबारा अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केलं. तसंच मेरी जंग, मै आझाद हूँ, खेल, मशाल, सागर, लक्ष्य, डॉन द चेस बिगिन्स अशा चित्रपटांचे संवादही त्यांनी लिहिले आहेत. एक विचारवंत म्हणूनही जावेद अख्तर यांची ओळख आहे. जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच अॅनिमल सिनेमावर मत मांडलं. ‘पुरुष स्त्रीला म्हणतो की माझ्यावर प्रेम असेल तर माझे बूट चाट’ अशा प्रकारचे संवाद असणारा चित्रपट जर सुपरहिट होत असतील तर आता प्रेक्षकांना काय बघायचं आहे? हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. हे परखड मत त्यांनी मांडलं होतं. त्यांच्यावर यासाठी टीकाही झाली. मात्र कुठल्याही टीकेची पर्वा न करता जावेद अख्तर हे त्यांची मतं धैर्याने मांडत असतात. जावेद अख्तर या कलाकारासारखा दुसरा कवी आणि गीतकार होणार नाही यात शंका नाही.