काही दिवसांपूर्वी ‘नॅशनल क्रश’ तृप्ती डिमरी हिने मुंबईत आलिशान घर घेतलं होतं. त्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने यानेही पाली हिलमध्ये कोट्यवधी रुपयांचं अपार्टमेंट घेतलं. याच यादीत आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या नावाचा समावेश झाला आहे. जावेद अख्तर यांनीही मुंबईत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे.
जावेद अख्तर यांनी नुकतीच मुंबईतील जुहू परिसरात एक मालमत्ता खरेदी केली आहे. ‘स्कवेअर यार्ड्स’ या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या दस्तऐवजाच्या माहितीनुसार, जावेद अख्तर यांनी अंदाजे १११.४३ स्क्वेअर मीटरचे एक रेडी-टू-मूव्ह-इन अपार्टमेंट विकत घेतले आहे. या अपार्टमेंटची किंमत ७.७६ कोटी रुपये आहे. २ जुलै रोजी या मालमत्तेचे व्यवहार पूर्ण झाले. या अपार्टमेंटसाठी जावेद अख्तर यांनी ४६.२ लाख रुपये मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्यूटी भरली तर ३० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले. हिंदुस्थान टाइम्सने याबद्दल वृत्त दिलं आहे.
मुंबईतील जुहू हा परिसर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी समुद्रकिनारी असलेल्या घरांमधून सुर्योदय व सूर्यास्त पाहणे कमालेची सुखावणारे असते. याठिकाणी सायंकाळी सुमद्रकिनाऱ्यावर चालणं आल्हाददायक असतं. या समुद्रकिनाऱ्यांमुळेच जुहू परिसरात घरांना खूप मागणी आहे. या भागात अनेक सेलिब्रिटींची समुद्रकिनारी घरं आहेत. याच भागात आता जावेद अख्तर यांनी नवीन अपार्टमेंट घेतलं आहे. येथील सागर सम्राट इमारतीमध्ये हे अपार्टमेंट आहे.
अपयश आल्याने शशी कपूर यांच्या तिन्ही मुलांनी सोडलं बॉलीवूड, आता काय करतात? जाणून घ्या
जावेद अख्तर यांनी ११३.२० स्क्वेअर मीटरचे (१२१८.४७ स्क्वेअर फूट) एक अपार्टमेंट २०२१ मध्ये सात कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याच अपार्टमेंटजवळ त्यांनी हे नवीन अपार्टमेंट घेतले आहे. खास गोष्ट म्हणजे आता ते याच इमारतीत वेगळ्या मजल्यावर राहतात. याच बिल्डिंगमध्ये त्यांनी हे दोन अपार्टमेंट घेतले आहेत.
आमिर खानने घेतलं घर
आमिरने काही दिवसांपूर्वी पाली हिलमध्ये ‘रेडी-टू-मूव्ह-इन’ अपार्टमेंट घेतलं. हे अपार्टमेंट अंदाजे १,०२७ चौरस फुटाचे आहे. २५ जून रोजी झालेल्या डीलनुसार यासाठी त्याने ३० हजार रुपये नोंदणी शुल्क व ५८.५ लाख स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क भरले. त्याच्या या अपार्टमेंटची किंमत ९.७५ कोटी रुपये आहे. आमिर खानची नवीन मालमत्ता पाली हिल परिसरातील बेला विस्टामध्ये आहे.
तृप्ती डिमरी झाली मुंबईकर
तृप्तीने काही दिवसांपूर्वी वांद्रे भागात बंगला घेतला. तृप्तीचा आलिशान बंगला कार्टर रोडजवळ आहे. तिच्या घराचे एकूण क्षेत्रफळ २२२६ चौरस फूट आहे. या घरासाठी तृप्तीने ७० लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. तृप्तीच्या नवीन घराच्या या व्यवहाराची नोंदणी ३ जून रोजी झाली होती.