बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे ते मोठ्या चर्चेत असतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, अँग्री यंग मॅन संकल्पना आणि रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाविषयी भाष्य केले आहे.
काय म्हणाले जावेद अख्तर?
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करीत धुमाकूळ घातला होता. मात्र, अनेकांकडून या चित्रपटावर मोठी टीकादेखील झाली होती. आता जावेद अख्तर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना चित्रपटातील ‘अँग्री यंग मॅन’ संकल्पनेबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “एखादी व्यक्तिरेखा कोणताही उद्देश नसताना रागात असल्याचे दाखवली, तर तिचे रूपांतर व्यंगचित्रात होते आणि ‘अॅनिमल’सारखा चित्रपट निर्माण होतो. मी आणि सलीम खानने १९७० च्या दशकात अनेक चित्रपटांतील नायकांच्या भूमिका या ‘अँग्री यंग मॅन’साठी लिहिल्या आहेत. मात्र, ते नायक प्रचलित व्यवस्थांविरुद्ध लढा द्यायचे, त्यांना त्याविषयी राग असायचा. व्यवस्थेविरुद्ध तरुणांमध्ये राग असणे ही ‘अँग्री यंग मॅन’ची संकल्पना असायची. त्यावेळी बेरोजगारीचा प्रश्न होता. शासन मोठ्या प्रमाणात फक्त वचनं देत आहे आणि वास्तवात त्याचा अवलंब करीत नाही, हे तरुणाई बघत असायची आणि त्यामुळे यावर सरकारला प्रश्न विचारत राहणे, हे काम तरुण लोक करीत असायचे.”
हेही वाचा: पाकिस्तानी महिला नेत्याबरोबरचा मुकेश अंबानी यांचा फोटो व्हायरल, तिच्या पतीने कॅप्शनमध्ये लिहिलं…
आताच्या चित्रपटातले पुरुष का रागात असतात? यावर उत्तर देताना म्हटले की, त्यांचा कोणावर राग असतो, तर स्त्रियांवर? आताच्या व्यवस्थेवर प्रश्न विचारावेत ही हिंमत या नायकांमध्ये नाही का? महिलांवर सहज वर्चस्व गाजवले जाऊ शकते, असे त्यांना का वाटते ?पुढे त्यांनी म्हटले आहे की, मला वाटत नाही की ते महिलाविरोधी आहेत. पण ज्या वेगाने महिला बदलत आहेत, त्या वेगाने ते अजून बदलू शकलेले नाहीत. पण, त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही. त्यांना बदलावेच लागेल. कारण- काही काळापासून चाललेली ही फसवणूक आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अँग्री यंग मॅन ही संकल्पना आजही का अस्तित्वात आहे; पण उत्तरेकडे फारसे तसे दिसत नाही. या प्रश्नाला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी म्हटले की, आपण अजून तरुण आहोत. दाक्षिणात्य चित्रपटांतील नायक हे व्यंगचित्रांमध्ये रूपांतरित होत आहेत. आता हा नायक असा आहे, जो स्त्रीला बूट चाटायला लावतो. हा अँग्री यंग मॅन आधीच व्यंगचित्रांमध्ये रूपांतरीत होत आहे.तुम्ही अॅनिमल चित्रपट पाहिला आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी आपण हा चित्रपट पाहिला नाही. मात्र, अनेकांकडून या चित्रपटाबद्दल ऐकलं आहे. नायक नायिकेला आपले बूट चाटायला सांगतो. ती खाली वाकते; पण देवाचे उपकार आहेत की, तो सीन तेवढाच आहे.
दरम्यान, जावेद अख्तर यांनी हे कबूल केले की, सलीम-जावेद लिखित चित्रपट कधीही स्त्रीभिमुख चित्रपट नव्हते; पण आमच्या चित्रपटात जितक्या स्त्रियांच्या भूमिका असायच्या त्यांना स्वत:ची मते असायची. त्यांनी आपल्या पतीला कधीही देवासारखे वागवले नाही.
जावेद अख्तर हे सलीम खानबरोबर, ‘शोले’ , ‘दीवार’, ‘मिस्टर इंडिया’ यांसारखे चित्रपट लिहिण्यासाठी ओळखले जातात.