प्रसिद्ध गीतकार, कवि जावेद अख्तर हे आजच्या पिढीलाही आपलेसे वाटतात. जावेद अख्तर त्यांनी त्यांच्या काव्यातील तारुण्य आजही जपलेलं आहे. याबरोबरच जावेद अख्तर त्यांच्या निर्भीड स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता नुकतंच ‘नेपोटीजम’विषयी केलेल्या वक्तव्यामुळे जावेद अख्तर पुन्हा चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान जावेद अख्तर यांनी हे वक्तव्य केलं.
नुकतंच ‘साहित्य आजतक २०२३’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी जावेद अख्तर, त्यांची कन्या व दिग्दर्शिका झोया अख्तर आणि गायक अंकुर तिवारी यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी बऱ्याच विषयांवर भाष्य केलं. आपली कन्या झोया हीच्या आगामी ‘द आर्चीज’ या चित्रपटाबद्दल जावेद अख्तर यांनी भाष्य केलं. याच चित्रपटात बऱ्याच स्टार्सची मुलं काम करताना दिसत आहेत. तेव्हा नेपोटीजमबद्दलही जावेद अख्तर यांनी वक्तव्य केलं.
आणखी वाचा : “… तर दंगली उसळल्या असत्या”, अमित सानाच्या आरोपांवर पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत स्पष्टच बोलला
जावेद अख्तर यांनी नेपोटीजम फिल्म इंडस्ट्रीमध्ये असूच शकत नाही असा दावा केला. ते म्हणाले, “चित्रपटसृष्टीतील नेपोटीजमविषयी बऱ्याचदा बोललं जातं, मला असं वाटतं की नेपोटीजम इतरत्र सर्वत्र असू शकतं पण ते चित्रपटसृष्टीत असूच शकत नाही. या क्षेत्रात जर तुम्हाला एखादा कलाकार पसंत पडला तरच त्याला पुढे काम मिळतं. चित्रपटसृष्टीत तुम्ही कुणालाही स्टार बनवू शकत नाही, स्टार हे फक्त प्रेक्षक बनवतात.”
याबरोबरच आपली मुलगी झोया हीच्या म्हणण्याला दुजोरा देत जावेद अख्तर पुढे म्हणाले, “आम्ही चित्रपट स्वतःच्या जीवावर बनवतो, आज झोया ही स्वतः धोका पत्करून एका चित्रपटाची निर्मिती करत आहे, अन् त्यातून नुकसान झाल्यासही त्याचं भार ती स्वतःवरच घेणार आहे. त्यामुळे तिला तिच्या चित्रपटात कोणाला घ्यायचं याचा पूर्ण अधिकार आहे, याबाबतीत तिला प्रश्न विचारता कामा नये. हे तिचं प्रोजेक्ट आहे आणि ती त्या प्रोजेक्टच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”