शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’ अखेर काल प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी या चित्रपटातील काही दृश्यांमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर ते दृश्य चित्रपटातून वगळण्यात आले आणि चित्रपट प्रदर्शित केला गेला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरदेखील या चित्रपटाला काहीजण विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळे ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा ट्रेंड अजूनही सुरू असल्याचं पहायला मिळतंय. आता जावेद अख्तर यांनी यावर भाष्य केलं आहे.
जावेद अख्तर नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमात त्यांना बॉयकॉट बॉलिवूड आणि शाहरुख खानबरोबर त्यांचं असलेलं नातं यांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार घालण्याबाबत त्यांचं मत मांडलं. तसंच शाहरुख हा खूप धर्मनिरपेक्ष आहे असंही ते म्हणाले.
आणखी वाचा : चित्रपटगृहात सुपरहिट पण IMDB वर निघाली ‘पठाण’ची हवा, ‘इतक्या’ प्रेक्षकांनी दिलं १० पैकी १ रेटिंग
बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडबद्दल बोलताना ते म्हणाले, “बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड हा यशस्वी होणार नाही. त्यामुळे त्याला इतकं महत्त्व देण्याची गरज नाही.” तर शाहरुख खानबद्दल त्यांनी सांगितलं, “शाहरुख खानबद्दल आतापर्यंत जे काही बोललं गेलं ते निरर्थक आहे. तो जेंटलमॅन आहे. तो खूप धर्मनिरपेक्ष आहे. मी त्यांच्या घरातील वातावरण पाहिलं आहे. ते कशाप्रकारे घरात राहतात, वावरतात, भारतीय सण कसे साजरे करतात हे मी पाहिलं आहे.”
हेही वाचा : सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्ये शाहरुख करणार कॅमिओ? हिंट देत भाईजान म्हणाला…
‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होताना दिसत आहेत. तसंच हा वाढता प्रतिसाद बघून या चित्रपटाचे अनेक शो वाढवण्यात आले आहेत. तर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने देशभरातून ५० हून अधिक कोटींची कमाई केली आहे.