काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील एका महोत्सवात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. त्यांच्याच देशात जाऊन त्यांना दहशतवादावरून सुनावल्याने भारतीयांनी त्यांचं खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर भारतात परतलेल्या जावेद अख्तर यांना पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक होती का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.
लाहोर येथील फैज महोत्सवात हजेरी लावून भारतात परतलेल्या जावेद अख्तर यांनी ‘एबीपी न्यूज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानामध्ये जाऊन केलेलं वक्तव्यं आणि भारत-पाकिस्तान फाळणीबद्दलही भाष्य केलं. सध्याची पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहिल्यावर पाकिस्तानची निर्मिती ही चूक होती का? असा प्रश्न जावेद अख्तर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं.
“मी तिसरं महायुद्ध…” पाकिस्तानमध्ये केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल जावेद अख्तरांची प्रतिक्रिया
“मला वाटतं की माणसाने केलेल्या १० सर्वात मोठ्या चुका, या नावाने एक पुस्तक लिहिलं गेलं, तर त्यामध्ये पाकिस्तानची निर्मिती असेल. पाकिस्तानची निर्मिती अतार्किक, कारण नसलेली होती. आता जे झालंय ते सत्य आपण स्वीकारायलाच हवं. मात्र, जे झालं ते बरोबर नव्हतं. धर्म कधीच देश बनवत नाही. धर्म एवढा सशक्त नाही की तो देश बनवू शकेल. असं असतं तर इटली आणि युरोप धर्मावर आधारित देश असते. जर तुम्ही एका धर्मावर आधारित देश बनवण्याचा विचार केलात, तर ते कांद्यावरील सालीसारखं आहे. तुम्ही एक काढाल तर दुसरी असेल. तुम्हाला खरा कांदा शोधण्यासाठी साली काढत राहावं लागेल,” असं जावेद अख्तर म्हणाले.
“सध्याच्या पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लीम नाहीत, शिया मुस्लीमही नाहीत. फाळणी झाली, तेव्हा हे सगळे मुस्लीम होते, पण आता नाहीत. हळूहळू या सर्व गोष्टी दूर होत आहेत, नाहिशा होत आहेत. आता आपणही तीच चूक करण्याच्या मार्गावर आहोत, जी त्यांनी ७० वर्षांपूर्वी केली होती”, असं जावेद अख्तर हिंदू राष्ट्राचा उल्लेख करत म्हणाले.