बॉलीवूडमधील दिग्गज पटकथा लेखक आणि कवी अशी ज्यांची ओळख आहे, ते म्हणजे जावेद अख्तर(Javed Akhtar) होय. अनेकदा जावेद अख्तर त्यांच्या केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी एका मुलाखतीत, मी सांगलीला जाण्याची कल्पना करायचो असे म्हटले आहे.
“मी सांगलीला जाण्याचा विचार करायचो”
जावेद अख्तर यांनी नुकतीच, ‘चिल सेश विथ सपन वर्मा’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही इतक्या वर्षांपासून लिहिता, पण एखादवेळी सूचत नाही की काय लिहावं, असं तुमच्याबरोबर कधी घडलंय का? असा अनुभव तुम्हाला कधी आला आहे का? यावर बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटले, “अनेकदा असे झाले आहे. जेव्हा मी एखाद्या चित्रपटासाठी कथा लिहायचो, तेव्हा प्रोड्यूसर मला खूप पैसे द्यायचा; मी ते पैसे परत देऊ शकत नव्हतो, त्यामुळे मला ते काम करायला लागायचे. मी जेव्हा स्क्रीप्ट लिहिण्यासाठी पेन आणि कोरा कागद घेऊन बसायचो, तर काहीच सूचायचे नाही. चित्रपटासाठी कशी गोष्ट असली पाहिजे वगैरे याबद्दल नवीन कल्पना डोक्यात यायची नाही. कारण प्रोड्यूसरने कोणत्याही प्रकारची गोष्ट, कल्पना न ऐकता माझ्यावर विश्वास ठेऊन तो करार माझ्याबरोबर केलेला असायचा. अशा वेळी जेव्हा मी कोरा कागद घेऊन बसलेलो असायचो तेव्हा मी विचार करायचो, मी पळून गेलो पाहिजे आणि मला माहीत नाही, मी यासाठी एका शहराचीदेखील निवड केली होती. ज्या ज्या वेळी पळून जाण्याची कल्पना करायचो, त्या त्या वेळी मी सांगलीला जाण्याचा विचार करायचो.”
पुढे बोलताना जावेद अख्तर म्हणतात, “आता जेव्हा मी मागे वळून बघतो आणि विचार करतो की, मी सांगलीलाच पळून जाण्याचा का विचार करत असे? तर मला अशी जाणीव झाली की, मी कधीच कोणत्या अशा व्यक्तीला भेटलो नाही, जी सांगलीवरून आली असेल किंवा अशी कोणतीच व्यक्ती नाही की जिने मला सांगितले की मी सांगलीला जाणार आहे. त्यामुळे मी विचार करायचो की, सांगली सगळ्यात सुरक्षित जागा आहे. याबरोबरच, माझी ओळख बदलून राहण्यासाठी मी स्वत:ला श्यामसुंदर हे नाव द्यायचे ठरवले होते. माझे नाव बदलून मी सांगलीमध्ये दुसरे काहीतरी काम करेन, अशी मी कल्पना करायचो. आता मी सांगलीला गेलो होतो, त्यावेळी मी तिथल्या लोकांना सांगितले की, तुम्ही माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावली आहे.”
लिखाणाविषयी बोलताना ते म्हणतात, “माझ्या विश्वास आहे, अनेक असे लोक आहेत, जे उत्तम लेखक होऊ शकतात. पण, जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात करता, त्यावेळी अनेकदा तुम्हाला सूचत नाही. अनेक दिग्गज लेखकदेखील, ज्यांना फार जवळून ओळखतो, त्यांनासुद्धा संपूर्ण पान लिहिल्यावर असं वाटतं की हे मी काय लिहिले आहे. ते सतत लिहित राहतात. हळूहळू तुम्हाला समजते की काय लिहायचे नाही. जेव्हा कमी पर्याय राहतात, तेव्हा तुम्हाला समजते की काय लिहायचे आहे. अनेक लोक या प्रोसेसमध्ये निराश होतात आणि लिहिणे सोडून देतात. कामामुळे तुम्हाला अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. पण, जेव्हा तुम्ही या गोष्टी शिकता, तुमच्या कामाकडे इतरांचे लक्ष वेधले जाते. तेव्हा मागे वळून बघताना तुम्हाला प्रश्न पडतो की हे मी कधी शिकलो. सुरुवातीच्या काळात तुम्ही स्वत:ला कमी महत्त्वाचे आणि लहान समजायला लागता”, असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जावेद अख्तर अनेक लोकप्रिय चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यासाठी ओळखले जातात.