बॉलीवूडमध्ये काही निवडक चित्रपटांचा अपवाद वगळता इतर सिनेमांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘स्त्री २’ आणि विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली; मात्र, इतर चित्रपटांना अपयशाला सामोरं जावं लागलं. त्याआधी २०२३ ला शाहरुखनं जवान, पठाण या चित्रपटांतून मोठी कमाई करीत बॉलीवूडला दिलासा दिला होता. मात्र, कोणत्या कारणांमुळे बॉलीवूडच्या चित्रपटांना सातत्यानं अपयशाचा सामना करावा लागत आहे, यावर सुप्रसिद्ध पटकथा लेखक, गीतकार जावेद अख्तर(Javed Akhtar) यांनी वक्तव्य केलं आहे.

जावेद अख्तर काय म्हणाले?

पीव्हीआर आयएनओएक्सच्या आमिर खान : सिनेमा का जादूगर या फिल्म फेस्टिवलच्या लाँचवेळी जावेद अख्तर व आमिर खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी या दोन दिग्गजांनी बॉलीवूड चित्रपटांना सातत्यानं येणाऱ्या अपयशाविषयी वक्तव्य केलं. बॉलीवूड सध्या मागे का आहे, यावर बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटलं, “हिंदी चित्रपटांचा प्रेक्षकांशी असलेला संबंध तुटला आहे. डब केलेले दाक्षिणात्य चित्रपट उत्तरेत कोटींची कमाई करीत आहेत. काही दाक्षिणात्य कलाकार उत्तरेतील प्रेक्षकांना माहीतही नसतात. त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतात आणि उत्तरेत त्या चित्रपटांची कमाई ६००-७०० कोटी होते.”

जावेद अख्तर यांच्या या मतावर युक्तिवाद करताना आमिर खाननं म्हटलं, “चित्रपट निर्मात्यांच्या भौगोलिक पार्श्वभूमीचा बॉलीवूडचे चित्रपट अपयशी ठरण्यामागे काहीही संबंध नाही. त्याबरोबरच दक्षिण विरुद्ध उत्तर, असाही मुद्दा नाही. आपण ज्या समस्येचा सामना करीत आहोत ती काहीतरी वेगळी आहे.” त्याबद्दल अधिक बोलताना आमिर खाननं म्हटलं, “आपण लोकांकडे जातो, त्यांना विनंती करतो की, कृपया आमचा चित्रपट पाहा. जर तुम्ही तो पाहिला नाहीत, तर आठ आठवड्यांत आम्ही तो तुम्हाला तुमच्या दाराशी आणून देऊ. म्हणजेच तो चित्रपट ओटीटीवर येतो. हे आपलं बिझनेस मॉडेल आहे. आठ आठवड्यांनंतर तुम्ही आधीच जे सबस्क्रिप्शन घेतलेलं असतं, त्यातून चित्रपट घरबसल्या पाहू शकता. मला माहीत नाही, एकच उत्पादन दोन वेळा कसं विकायचं.”

पुढेआमिर खाननं , “माझ्याकडे आधी पर्याय नव्हता म्हणून मी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचो. आता ते फॅन्सी वाटतं म्हणून मी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतो. आपण कुठेही बसून कुठलाही चित्रपट पाहू शकतो. त्यामुळे थिएटरला जाण्याची गरज उरलेली नाहीये. आपण आपले स्वतःचे व्यवसाय मॉडेलच बिघडवले आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांना अपयश येण्यामागे हे एक कारण असू शकतं”, असं मत मांडलं आहे.

Story img Loader