सलीम-जावेद या जोडीने भारतीय चित्रपटसृष्टीला एकाहून एक असे सरस चित्रपट दिले. कालांतराने ही जोडी वेगळी झाली, पण आजही प्रेक्षक त्यांची आठवण काढतात. नुकतंच सलीम खानचा मोठा मुलगा अरबाज खान याने सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याशी संवाद साधला. ‘बॉलिवूड बबल’च्या एका चॅटशोमध्ये या दोन्ही लेखकांनी अगदी मोकळेपणाने संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या भागात सलीम खान आणि दुसऱ्या भागात जावेद अख्तर यांच्याशी अरबाजने संवाद साधला. दोघांनी सगळ्या प्रश्नांची अगदी मस्त उत्तरं दिली. चित्रपटसृष्टीतील वेगवेगळ्या गोष्टी आणि त्यांच्या एकत्र काम करण्याच्या पद्धतीवर जावेद अख्तर यांनी स्पष्टपणे भाष्य केलं. याच मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दलही भाष्य केलं आहे. ते दारूच्या इतक्या आहारी गेले होते की ते व्यसन त्यांच्या जीवावर उठलं असतं या गोष्टीचा त्यांनी खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “तेव्हाच्या प्रेक्षकांना…” शाहरुखच्या ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’च्या लेखकाने सांगितलं चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्यामागील कारण

याबद्दल जावेद अख्तर म्हणाले, “मी केवळ मजा करायची, एंजॉय करायचं म्हणून दारू घ्यायचो. दुःख विसरण्यासाठी मी कधीच मद्यपान केलेलं नाही. पण एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की माझी मद्यपानाची सवय अशीच राहिली तर मी फारफार तर वयाच्या ५२ किंवा ५३ वर्षापर्यंत जगेन. ३१ जुलै १९९१ या दिवशी मी एक संपूर्ण रमची बाटली रिचवली. पण त्याच्या पुढच्या दिवसापासून मि दारूला स्पर्शही केलेला नाही, किंवा मी साधा शॅंपेनचा एक घोटही घेतलेला नाही.”

जावेद अख्तर यांच्या विलपॉवरचं अरबाज खानने कौतुक केलं. त्याबद्दल जावेद अख्तर म्हणाले, “विलपॉवर वगैरे काही नाही, जगण्यासारखं दुसरं व्यसन कोणतंही नाही.” आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातही जावेद अख्तर यांनी हजेरी लावलेली तेव्हा त्यांनी त्यांच्या या मद्यपानाबद्दलही खुलासा केला होता. वयाच्या १९ व्या वर्षीच त्यांना दारूचं व्यसन जडलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed akhtar speaks about his alcoholism says he used to drink only for enjoyment avn