बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने ‘जवान’मधून दमदार कमबॅक केला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुखच्या या चित्रपटात दाक्षिणात्य कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. शाहरुखने सर्वप्रथम दिग्दर्शक अॅटलीबरोबरच काम केलं. याबरोबरच या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती व अभिनेत्री नयनतारा यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटात नयनताराच्या कामाची खूप प्रशंसा झाली. ‘जवान’च्या घवघवीत यशानंतर नयनताराच्या पुढच्या बॉलिवूड चित्रपटाची प्रेक्षक वाट बघत आहेत. अशातच आता नयनतारा कोणत्या दिग्दर्शकाबरोबर काम करणार आहे याबद्दल माहिती समोर आली आहे. लवकरच नयनतारा संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘बैजू बावरा’ या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. मध्यंतरी हा चित्रपट डबाबंद झाल्याची बातमी समोर आली होती, पण आता काही दिवसांपूर्वी याबद्दल नवे अपडेट समोर आले आहेत.

आणखी वाचा : देशात सैन्याचं प्रशिक्षण अनिवार्य करण्याबाबत कंगना रणौतचं विधान चर्चेत; म्हणाली, “तरच या आळशी…”

मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटात रणवीर सिंह व आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. आता या चित्रपटात नयनतारादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. ‘इ-टाइम्स’च्या वृत्तानुसार ‘जवान’नंतर नयनताराचा पुढचा चित्रपट ‘बैजू बावरा’ असणार असं सांगितलं जात आहे. अद्याप नयनताराने याबद्दल अधिकृत भाष्य केलेलं नाही किंवा तिने चित्रपटही साईन केलेला नाही.

याचवर्षी मार्च महिन्यात नयनतारा व तिचा पती विघ्नेश सीवन हे संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर दिसले होते. तेव्हापासून नयनतारा संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करणार याबद्दल अफवा पसरल्या होत्या. ‘बैजू बावरा’मध्ये नयनतारा आलिया भट्टची भूमिका करणार नसून तिची एक महत्त्वाची भूमिका असेल असं सांगितलं जात आहे. भन्साळी सध्या त्यांच्या ओटीटीवरील ‘हिरामंडी’ या प्रोजेक्टवर काम करत आहेत. यानंतर ते ‘बैजू बावरा’वर काम सुरू करतील असं स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawan actress nayanthara in talks with sanjay leela bhansali for baiju bawra avn