‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट खूपच चांगला आहे, असं कौतुक प्रेक्षक करत आहेत. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली. अशातच आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाची आकडेवारीही समोर आली आहे.
चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात १२९.६ कोटी रुपये कमवत इतिहास रचला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाच्या आकडेवारीत पहिल्या दिवसाच्या तुलनेत घट झाली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘जवान’ने दुसऱ्या दिवशी ५३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी देशभरात ७५ कोटींचे कलेक्शन करून हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
देशातच नव्हे तर परदेशातही दणक्यात सुरुवात, ‘जवान’ने पहिल्याच दिवशी जगभरात कमावले तब्बल…
‘जवान’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी घट होण्याचं मुख्य कारण म्हणजे शुक्रवारी सुट्टी नसणे होय. सुट्टी नसतानाही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. ते पाहता वीकेंडला शनिवार व रविवारी ‘जवान’च्या कमाईत मोठी वाढ होईल, असं दिसत आहे. पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडणारा ‘जवान’ वीकेंडला २०० कोटींचा टप्पा सहज पार करेल, असं दिसतंय.
दरम्यान, ‘जवान’बद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा व विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय यामध्ये प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, आलिया, गिरीजा ओक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय दीपिका पदुकोणचा कॅमिओदेखील आहे.