शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील शाहरुखचा फर्स्ट लूक, टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. आता नुकतंच या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ३० ऑगस्टला ‘जवान’चा एक प्री-रिलीज इवेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटाशी जोडलेल्या प्रत्येक कलाकाराने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. याच कार्यक्रमात चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटलीने शाहरुख खानशी असलेल्या एका खास कनेक्शनची आठवण करून दिली.
शाहरुखच्या इतर चाहत्यांनाप्रमाणेच अॅटलीनेसुद्धा एकेकाळी शाहरुख खानच्या मुंबईतील ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर उभं राहून त्याची वाट पाहिली आहे आणि तब्बल १३ वर्षांनी शाहरुखबरोबर काम करायचं त्याचं स्वप्न पूर्ण होत आहे असं अॅटलीने स्पष्ट केलं. अॅटली म्हणाला, “१३ वर्षांपूर्वी मीदेखील ‘मन्नत’बाहेर उभा राहून फोटो काढला होता. आता त्याच घराचे दरवाजे खुद्द शाहरुख खानने माझ्यासाठी उघडले अन् माझी स्क्रिप्ट ऐकून त्यावर काम केलं. तो माझ्यासाठी वाडिलांसमानच आहे.”
अॅटली मंचावर आपले अनुभव सांगत होता तेव्हा त्याच्या पत्नीलाही अश्रू अनावर झाले. इतकंच नव्हे तर आपली पत्नी गरोदर असताना शाहरुख खानने दिलेल्या मानसिक आधाराबद्दलही अॅटलीने सांगितलं. ‘जवान’ ७ सप्टेंबरला चित्रपटगृहात धडकणार आहे. येत्या शुक्रवारपासून त्याचं सगळीकडेच अडवांस बुकिंगही सुरू होणार आहे.