शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जानेवारीत ‘पठाण’ चित्रपट रिलीज झाल्यापासूनच ‘जवान’ची चर्चा रंगली होती. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते ‘जवान’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान शाहरुखच्या चाहत्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. भारतात चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, दिल्लीसारख्या अनेक शहरांमध्ये ॲडव्हान्स बुकिंगही फुल्ल झाले आहेत. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे २ हजार रुपयांमध्ये तिकिटे विकली जात आहेत. उत्तर प्रदेशमधील मालेगाव शहरात ॲडव्हान्स बुकिंगसाठी चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली होती. रात्री २ वाजता चाहते चित्रपटगृहाबाहेर उभारुन ‘जवान’ चित्रपटाच्या तिकिटांची ॲडव्हान्स बुकिंग करताना दिसत आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. हिंदीबरोबरच हा चित्रपट तमिळ, तेलगु भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.