शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत ‘जवान’ चित्रपट गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. प्रेक्षक या चित्रपटाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. ‘जवान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी जोरदार कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी देशभरात ७५ कोटी रुपयांचा गल्ला जमविणाऱ्या जवानच्या जगभरातील कमाईची आकडेवारी समोर आली आहे.
‘जवान’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला. व्यापार अहवालानुसार, शाहरुख खान स्टारर या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी तब्बल ७५ कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १५० कोटींहून अधिक कमाई केली. ‘जवान’ आता बॉलीवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.
व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर नमूद केलं की ‘जवान’ने जगभरात १५० कोटी रुपयांची पहिल्या दिवशी कमाई केली आहे.
‘जवान’ने गुरुवारी ऑस्ट्रेलियात ४ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सची कमाई केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन बॉक्स ऑफिसवर अव्वल स्थान मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये, चित्रपटाने ३९.१३ लाख रुपयांची कमाई केली. तर जर्मनीमध्ये ‘जवान’ने १.३० कोटींचा व्यवसाय केला. याशिवाय उत्तर अमेरिका, यूके आणि कॅनडामध्येही चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलंय.