बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) हा विविध विषय असलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्यामध्ये काही सामाजिक विषयांचा समावेशही असतो. ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा अक्षय कुमारचा चित्रपट हा त्यापैकी एक आहे. २०१७ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ग्रामीण भागात शौचालये नसल्यामुळे काय काय घडू शकते, अशा आशयाचा हा चित्रपट होता. अक्षय कुमारबरोबर या चित्रपटात भूमी पेडणेकरने स्क्रीन शेअर केली होती. त्याबरोबरच, दिव्येंदू व अनुपम खेर हे प्रमुख भूमिकांत दिसले होते. या चित्रपटाने संपूर्ण जगभरात ३०० कोटींची कमाई केली होती. आता जया बच्चन(Jaya Bachchan) यांनी या चित्रपटाच्या नावावर मोठे वक्तव्य केले आहे.
मी कधीच चित्रपट पाहण्यास…
जया बच्चन यांनी १९६३ साली ‘महानगर’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, आजच्या काळातील चित्रपटांबाबत त्यांचे फारसे चांगले मत असल्याचे पाहायला मिळत नाही. नुकतीच त्यांनी इंडिया टीव्ही कॉन्क्लेव्हमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अक्षय कुमारच्या एका चित्रपटाच्या नावावर त्यांचे मत व्यक्त केले. ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाबद्दल त्या म्हणाल्या, “या चित्रपटाचे नाव बघा. असे नाव असेल, तर मी कधीच चित्रपट पाहण्यास जाणार नाही. हे असे नाव असते का?”, असे म्हणत जया बच्चन यांनी चित्रपटाच्या अशा नावावर नाराजी दर्शवली. पुढे त्यांनी प्रेक्षकांना विचारले की, जर एखाद्या चित्रपटाचे असे नाव असेल, तर ते चित्रपट पाहण्यास जातील का, असा प्रश्न विचारला. त्यावर काही जणांनी हात वर केला. यावर जया बच्चन यांनी म्हटले, “इतक्या लोकांमध्ये फक्त चार लोक असे नाव असलेले चित्रपट पाहण्यास जाणार असतील, तर ती दु:खाची गोष्ट आहे. त्यामुळे असे चित्रपट फ्लॉप होत आहेत.”
अक्षय कुमारचा टॉयलेट: एक प्रेमकथा या चित्रपटाबरोबर पॅडमॅन या चित्रपटाची देखील चांगलीच चर्चा झाली होती. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. याबरोबरच अभिनेता नुकताच स्काय फोर्स या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तो आगामी काळात कोणत्या चित्रपटातून तसेच कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, जया बच्चन २०२४ मध्ये सदाबहार या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसल्या होत्या. अभिनयाबरोबरच जया बच्चन या त्याच्या स्पष्ट वक्तव्यासाठीदेखील ओळखल्या जातात. सोशल मीडियावर अनेकदा त्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.