Amitabh Bachchan Rekha Affair : बॉलीवूडमध्ये काही स्टार्सची अफेअर्स खूप गाजली. काहींच्या ब्रेकअपला अनेक वर्षे झाली आहेत, ते आपापल्या आयुष्यात फार पुढे निघून गेलेत मात्र तरीही त्यांची चर्चा होते. राज कपूर- नर्गिस, शत्रुघ्न सिन्हा- रीना रॉय, अमिताभ बच्चन – रेखा, अक्षय कुमार- रवीना टंडन, सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्याबद्दल आजही बोललं जातं. अमिताभ बच्चन व रेखा यांची प्रेमकहाणी तर सर्वश्रूत आहे.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरची एकेकाळी बॉलीवूडमध्ये खूप चर्चा होती. अमिताभ बच्चन यांनी हे नातं कधीच स्वीकारलं नाही, तर रेखा यांनी अमिताभ यांच्यावर प्रेम असल्याचं अनेकदा म्हटलंय. अमिताभ बच्चन व जया यांचं लग्न झालं आणि ही प्रेमकहाणी अपूर्ण राहिली. ‘मेरी सहेली’ पॉडकास्टवर, ज्येष्ठ लेखक आणि चित्रपटांचे जाणकार हनिफ झावेरी यांनी जया, अमिताभ व रेखा यांच्याबद्दल काही आश्चर्यचकित करणारे खुलासे केले.

अमिताभ व रेखा होते प्रेमात

‘दो’ अंजानेच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि अमिताभ बच्चन एकमेकांकडे आकर्षित झाल्याचा खुलासा हनीफ झावेरी यांनी केला. “ते खूप जवळ आले होते, पण ते प्रेमात कसे पडले हे मला माहीत नाही, पण ते प्रेमात होते याची मला १०० टक्के खात्री आहे,” असं ते म्हणाले.

अमिताभ बच्चन, रेखा व जया बच्चन (फोटो – सोशल मीडिया)

…अन् रेखा -अमिताभ झाले वेगळे

रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चांबद्दल जया अनभिज्ञ होत्या असं नाही. त्यांना या दोघांच्या नात्याबद्दल काही गोष्टी समजल्या, त्यानंतर त्यांनी एक मोठं पाऊल उचललं. अमिताभ बच्चन एकदा शहराबाहेर होते, त्यावेळी जया बच्चन यांनी रेखा यांना घरी जेवणासाठी बोलावलं. “जया यांनी रेखा यांचा पाहुणचार केला, त्यांना चांगले पदार्थ खाऊ घातले आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. जेव्हा रेखा यांनी निघायची वेळ आली तेव्हा जया त्यांच्याकडे पाहत म्हणाल्या, ‘अमिताभ माझे आहेत. ते माझे होते आणि नेहमीच माझे राहतील.’ जया बच्चन असं बोलल्यानंतर रेखा बिग बींच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतला,” असं झावेरी म्हणाले.

अमिताभ बच्चन आणि रेखा शेवटचे ‘सिलसिला’ या चित्रपटात एकत्र दिसले होते, या चित्रपटात जया बच्चन देखील होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला पण अनेक वर्षांनंतर तो कल्ट क्लासिक बनला.