अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या तिच्या पॉडकास्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘व्हॉट द हेल नव्या’ या कार्यक्रमातून बच्चन कुटुंबीयांच्या अनेक वैयक्तिक गोष्टींचा खुलासा करण्यात आला. प्रेम, नातेसंबंध, मैत्री या सगळ्या विषयांवर नव्या तिची आई श्वेता आणि आजी जया बच्चन यांनी भरभरून गप्पा मारल्या.
‘व्हॉट द हेल नव्या’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागात नव्याने विचारते, “जर दोन लोक फक्त मित्र असतील तर मैत्रीमध्ये रोमान्स ठेवणं योग्य आहे का?” यावर जया बच्चन म्हणाल्या, “माझा सगळ्यात जवळचा मित्र आपल्या घरातच आहे. हे खरं आहे की, माझे पती माझे सगळ्यात चांगले मित्र आहेत. मी त्यांच्यापासून काहीच लपवत नाही.” आजीने दिलेलं उत्तर ऐकून नव्या फारच भारावून गेल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
नव्याची आई श्वेता यावर म्हणाली, “मला एक गोष्ट कळत नाही ती म्हणजे, ‘माझी मुलगी किंवा मुलगा माझा बेस्ट फ्रेंड आहे’ असं म्हणायला सगळ्यांनाच का आवडतं?” याबद्दल जया बच्चन सांगतात, “का? तुमची मुलं तुमचे मित्र होऊ शकत नाहीत का?” पुढे श्वेता म्हणते, “बघ ना… आता आपण मित्र नाही आहोत कारण, तू माझी आई आहेस. प्रत्येक नात्यात विशिष्ट मर्यादा असतात ज्या आपण ओलांडू शकत नाही. माझी मुलं ही कायम माझी मुलंच असतील आणि माझे मित्र-मैत्रिणी वेगळे आहेत.”
दरम्यान, नव्याबद्दल सांगायचं झालं, तर अमिताभ व जया बच्चन यांच्याप्रमाणे त्यांची नात नव्या नवेली नंदाही नेहमीच चर्चेत असते. नव्याचा चाहतावर्गही मोठा आहे. नव्या अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते.