अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे जितके चर्चेत असतात, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील बऱ्याचदा चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनयातून त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण केलेला आहे. जगभरात त्यांचे चाहते असलेले दिसतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरदेखील सक्रिय असलेले दिसतात, ब्लॉगच्या माध्यमातून ते त्यांची मते व्यक्त करतात. तसेच ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर ते चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक किस्से सांगतात. याबरोबरच अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळेदेखील बच्चन कुटुंब मोठ्या चर्चेत होते. अमिताभ बच्चन हे त्यांची पत्नी व अभिनेत्री जया बच्चन(Jaya Bachchan) यांनी केलेल्या वक्तव्यांमुळेदेखील मोठ्या चर्चेत असलेले दिसतात.
मला अशी पत्नी नको…
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या परखड वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. अनेकदा त्या त्यांची नात नव्या नंदाच्या पॉडकास्टमध्ये दिसतात. या पॉडकास्टमध्ये त्या विविध विषयांवर गप्पा मारताना दिसतात. या पॉडकास्टमध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांच्या लग्नाबद्दल बोलताना जया बच्चन म्हणाल्या, “माझा कामाचा भार कमी होईल असा विचार करून आधी आम्ही ऑक्टोबरमध्ये लग्न करायचे ठरवले होते. अमिताभ बच्चन यांनी मला काही निवडक प्रोजेक्टवर काम करावे असे सुचवले. लग्नाआधी अमिताभ बच्चन यांनी एक अट ठेवली होती. ते म्हणाले होते, मला अशी पत्नी नको जी ९ ते ५ काम करेल.” निवडक चित्रपटांत काम केले पाहिजे असे त्यांनी सुचवले होते, असे जया बच्चन यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी ३ जून १९७३ ला लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अमिताभ बच्चन काम करत राहिले, तर जया बच्चन या संसारात मग्न झाल्या. त्यांनी काही निवडक चित्रपटात कामे केली. मुलांच्या जन्मानंतर त्यांनी कुटुंबाला जास्त वेळ दिला. त्यांना श्वेता व अभिषेक बच्चन ही मुले आहेत. श्वेता बच्चनने निखिल नंदाबरोबर लग्न केले आहे, तर अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायबरोबर लग्नगाठ बांधली आहे. त्यांना आराध्या ही मुलगी आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या दोघेही बॉलीवूडमधील प्रसिद्ध चेहरे आहेत.
दरम्यान, जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या नावावर टीका केली होती. अशी नावे असतील तर प्रेक्षक चित्रपट का पाहतील? असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. तसेच मी असे चित्रपट कधीच पाहणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची मोठी चर्चा होताना दिसली होती. अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करत असल्याचे दिसत आहे. आता ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.