बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन नेहमीच चर्चेत असतात. आत्तापर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच जया बच्चन त्यांच्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळेही ओळखल्या जातात. इतर कलाकरांप्रमाणे जया बच्चन सोशल मीडियावर सक्रिय नसतात. त्या आपले फोटो व व्हिडीओ कधीच सोशल मीडियावर शेअर करताना दिसत नाहीत. एका मुलाखतीत त्यांनी सोशल मीडियापासून लांब राहण्यामागचे कारण सांगितले आहे.
नुकतेच जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेलीच्या व्हॉट द हेल नव्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी श्वेता बच्चनही हजर होती. यावेळी जया बच्चन यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. दरम्यान त्यांनी सोशल मीडिया न वापरण्यामागचे कारण सांगितले आहे. त्या म्हणाल्या, ”जगाला आपल्याबद्दल खूप माहिती आहे. आम्हाला ते इन्स्टाग्रामवर शेअर करण्याची गरज नाही.”
‘व्हॉट द हेल नव्या’च्या गेल्या एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी “सोशल मीडियावर नकारात्मक कमेंट्स करणाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्या म्हणालेल्या, “जर तुम्हाला कमेंट करायची असेल, तर सकारात्मक करा. पण, तुम्हाला तर तुमचा निर्णयच ऐकवायचा असतो. जर टीका करणाऱ्यांना माझ्या समोर बसून बोलायला लावले तर त्यांची हिंमत होणार नाही. त्यांची हिंमत तरी होईल का समोर बसून बोलण्याची. हिंमत असेल तर खऱ्या गोष्टींवर बोलून दाखवा, तुमचा चेहराही समोर येऊ दे.”
जया बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, वयाच्या ७५ व्या वर्षातही त्या अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’ चित्रपटात त्या झळकल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्याबरोबर रणवीर सिंह, आलिया भट्ट, शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांची प्रमुख भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.