मीडियाशी संवाद साधणे असो किंवा एखाद्या गोष्टीवर राज्य सभेत मत मांडणं असो, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखल्या जातात. अभिनयाव्यतिरिक्त जया बच्चन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात. नुकतंच जया बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चन नंदासह आपली नात नव्या नवेली नंदा हीच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. नुकताच नव्याच्या ‘व्हॉट द हेल नव्या’चा दुसरा सीझन प्रदर्शित झाला.
या पॉडकास्टमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या यांनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारली. स्त्री-पुरुष समानतेवर या शोमध्ये भाष्य करण्यात आलं. शिवाय पुरुष प्रधान क्षेत्रात महिलांना येणाऱ्या अडचणींवरही जया बच्चन यांनी भाष्य केलं. यादरम्यान भाष्य करताना जया बच्चन यांनी त्यांना अभिनय क्षेत्रात नव्हे तर सैन्यात जायचं होतं हे स्पष्ट केलं, पण त्यावेळी एकूणच समाजातील लोकांचे विचार आणि स्त्री-पुरुष यांच्यात केला जाणारा भेदभाव यामुळे जया बच्चन यांचं ते स्वप्न अपूर्णच राहिलं.
आणखी वाचा : “मी आजवर ‘शोले’ व ‘दीवार’ हे चित्रपट पाहिलेले नाहीत”, शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं नेमकं कारण
जया बच्चन म्हणाल्या, “मला अजूनही आठवतंय त्यावेळी मला सैन्यात भरती व्हायचं होतं, पण मला ते जमलं नाही ज्यामुळे मी खूप निराश झाले होते. त्यावेळी सैन्यात महिलांना केवळ नर्स म्हणूनच भरती केलं जायचं. अभिनयापेक्षा मला सैन्यात भरती होण्याचे तेव्हा वेध लागले होते.” जया बच्चन यांच्याच म्हणण्याला दुजोरा देत श्वेता बच्चननेही स्त्री-पुरुष यांच्यात होणाऱ्या भेदभावाबद्दल भाष्य केलं.
आता मात्र चित्र बदलत आहे, आता एखाद्या कारमध्ये पुरुष बसला असेल अन् स्त्री कार चालवत असेल हे चित्र फार सामान्य मानलं जातं. असंही श्वेता बच्चन हिने निरीक्षण मांडलं. जया बच्चन या गेल्याचवर्षी करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकल्या. या चित्रपटातही स्त्री-पुरुष समानता, पितृसत्ताक मानसिकता यावर उत्तमरित्या भाष्य करण्यात आलं. शिवाय जया बच्चन यांनी नुकताच स्वतःच्या एकूण संपत्तीबद्दल खुलासा केला ज्यामुळे त्या चर्चेत आल्या. अमिताभ बच्चन व जया बच्चन यांची एकूण संपत्ती १५७८ कोटींची आहे.