बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तसेच सध्या राज्यसभेच्या समाजवादी पक्षाच्या खासदार असलेल्या जया बच्चन यांनी मंगळवारी ( ११ फेब्रुवारी ) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना चित्रपट उद्योगावर ‘दया’ दाखवावी आणि ही इंडस्ट्री टिकवून ठेवण्यासाठी एक प्रस्ताव आणावा अशी विनंती केली आहे. राज्यसभेत २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जया बच्चन यांनी संसदेत सरकारवर चित्रपट उद्योग ‘नष्ट’ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना जगणं कठीण झालंय असं म्हटलं आहे. अलीकडच्या काळात सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होत आहेत कारण, लोक चित्रपटगृहात जात नाहीत. सगळंच खूप महाग झालंय. त्या म्हणाल्या, “तुम्ही चित्रपट उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे आणि याआधीची इतर सरकारेही तेच करत होती.”

जया बच्चन पुढे म्हणाल्या, “तुम्ही चित्रपट आणि मनोरंजन उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे कारण, तुम्ही त्यांचा वापर फक्त तुमच्या स्वतःच्या उद्देशासाठी करता. आज, जीएसटी वगळता, सर्व सिंगल स्क्रीन बंद होत आहेत. सर्व काही महाग झाल्यामुळे लोक थिएटरमध्ये जात नाहीत. कदाचित तुम्हाला हा चित्रपट उद्योग पूर्णपणे संपवायचा असेल. मात्र, फिल्म इंडस्ट्रीमुळे संपूर्ण देश एकत्र जोडला जातो हे आपण विसरू शकत नाही.”

जया बच्चन यांचं अर्थमंत्र्यांना आवाहन

“मी माझ्या चित्रपट उद्योगाच्या वतीने बोलत आहे आणि ऑडिओ-व्हिज्युअल उद्योगाच्या वतीने या सभागृहाला विनंती करत आहे की, कृपया त्यांच्यावर थोडी ‘दया’ करा. तुम्ही या उद्योगाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात. कृपया असं करू नका. मी अर्थमंत्र्यांना विनंती करते की, त्यांनी याचा विचार करावा आणि या उद्योगाला टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी करावे.” अशी मागणी जया बच्चन यांनी यावेळी केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaya bachchan urges government to have mercy on film industry sva 00