दिग्गज अभिनेते मनोज कुमार(Manoj Kumar) यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनयाबरोबरच निर्माते, दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी त्यांचे वेगळे स्थान निर्माण केले. देशभक्तीपर चित्रपटांसाठी त्यांना ओळखले जाते. त्यांना भारतकुमार म्हणूनही ओळखले जाते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच माध्यमांशी बोलताना मनोज कुमार यांच्या निधनाबाबत हळहळही व्यक्त केली होती. अनेक कलाकार त्यांच्या शोकसभेला हजर होते. जया बच्चन(Jaya Bachchan)देखील या शोकसभेत हजर होत्या. मात्र, जया बच्चन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

जया बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल

जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, जया बच्चन कोणाशी तरी बोलत आहेत. त्यांच्या पाठीमागे एक ज्येष्ठ महिला व पुरुष असे दोघे जण दिसत आहेत. ती महिला जया बच्चन यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. जया बच्चन यांच्या खांद्याला हात लावून ती महिला त्यांना बोलावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानंतर जया बच्चन त्या महिलेकडे वळत तिला ढकलत असल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच त्या महिलेबरोबर असलेली व्यक्ती त्यांचा फोटो काढताना दिसते. त्याला त्या रागावताना दिसतात. त्यानंतर ते दोघेही जया बच्चन यांना सॉरी, असे म्हणताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जया बच्चन यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी जया बच्चन बरोबर असल्याचे म्हटले आहे; तर काहींनी जया बच्चन यांना उद्धट, असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “मला वाटत नाही की, ती महिला जया बच्चन यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती. ती फोटो काढण्याचा प्रयत्न करीत होती. शोकसभा ही फोटो काढण्याची जागा नाही. जया बच्चनसुद्धा शांतपणे बोलू शकल्या असत्या.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “जे लोक शोकसभेत फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हाकलून दिले पाहिजे. यावेळी जया बच्चन यांचे वागणे बरोबर आहे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “जया बच्चन कुठेही भांडण्यासाठी तयार असतात.” एका नेटकऱ्याने लिहिले, “त्या स्वत:ला ऐश्वर्या राय समजतात”, “माहीत नाही, स्वत:ला काय समजतात.”

मनोज कुमार यांच्या शोकसभेत आमिर खान, उदित नारायण, ईशा देओल, फरहान अख्तर, नील नीतेश मुकेश, सोनू निगम, प्रेम चोप्रा असे अनेक कलाकार उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना आमिर खान म्हणाला, “मी त्यांना भेटू शकलो नाही, याचा मला पश्चात्ताप आहे. ते आजारी असल्याचे मला समजले होते; पण त्यांना भेटणे शक्य झाले नाही. मी त्यांच्या मुलाशीदेखील बोललो. त्यांना भेटू न शकल्याचा मला कायम पश्चात्ताप राहील. मी त्यांच्या कामाचा मोठा चाहता होतो आणि कायम राहीन. त्यांच्या जाण्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक होते”, असे म्हणत आमिर खानने दिवंगत अभिनेते मनोज कुमार यांच्याबाबतच्या भावना व्यक्त केल्या.