प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री जिया खानने अगदी कमी काळात सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. पण वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी तिने गळफास घेत आयुष्य संपवलं. ३ जून २०१३ साली जियाने तिच्या जुहूमधील राहत्या घरी आत्महत्या केली. जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड व अभिनेता सूरज पांचोलीवर लावण्यात आला होता. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. त्यातच आता सूरज पांचोलीची एक पोस्ट व्हायरल होत आहे.
जिया खानचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. आता या प्रकरणाला जवळपास १० वर्षे उलटली आहे. मात्र अद्याप जिया खानच्या मृत्यूचं गूढ उलगडलेलं नाही. गेल्या १० वर्षांपासून सुरु असलेल्या तपासात सीबीआयने हस्तक्षेप केला आहे. आता एका दशकानंतर कोर्टात सुनावणी होणार आहे.
आणखी वाचा : गर्भवती जिया खानला बॉयफ्रेंड सूरज पांचोलीने दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्या? सुसाईड नोटमध्ये म्हणाली होती, “तुझ्या प्रेमात…”
या सर्व प्रकरणादरम्यान आता सूरज पांचोलीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. यात सूरजने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. “चला परत भेटू इन्स्टाग्राम, जेव्हा संपूर्ण जग हे एक चांगले ठिकाण होईल, त्यावेळी पुन्हा नक्कीच भेटू, अशी आशा आहे. मला श्वासाची गरज आहे”, असे सूरजने या पोस्टमध्ये म्हटले होते. सूरजने २०२० मध्ये ही पोस्ट केली होती. त्यानंतर सूरजने त्याच्या इन्स्टाग्रामच्या सर्व पोस्टही डिलीट केल्या होत्या.
दरम्यान जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने आरोपपत्रही सादर केले होते. २०१३ मध्ये आत्महत्येपूर्वी ती गर्भवती होती, असा दावा करण्यात आला होता. तिचा प्रियकर सूरज पांचोली याने तिला गर्भपातासाठी औषध देऊन शौचालयात गर्भ फ्लश केल्याचा दावाही करण्यात आला होता.
आणखी वाचा : लेकीच्या जन्मानंतर वजन कसं कमी केलं? आलिया भट्ट म्हणाली “माझ्या सासूने…”
या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, जियाला चार आठवड्यांनंतर तिच्या गरोदरपणाबद्दल कळलं होतं, तर सूरजला हा प्रकार कळताच तो तिला गर्भपातासाठी स्त्रीरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेला. जियाला तेथून गर्भपातासाठी काही औषधेही दिली गेली होती. ‘एबीपी लाइव्ह’ने यासंदर्भात वृत्त दिलं होतं. आत्महत्येपूर्वी जिया खानने सुसाईड नोटही लिहिली होती. त्यात तिने तिला होणारा त्रास सांगितला होता.