जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. २० एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, या प्रकरणी आज न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. तब्बल १० वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याने अभिनेत्री जिया खानला न्याय मिळणार का? याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आजच्या सुनावणीपूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेता सूरज पांचोली विशेष सीबीआय न्यायालयात दाखल झाला आहे. सूरज पांचोलीवर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. जियाची आई राबिया खान यांनीही सूरज पांचोलीवर अनेक आरोप केले होते. मुलीला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता, असंही त्यांनी म्हटलं होतं.
नेमकं काय आहे प्रकरण?
अभिनेत्री जिया खान ३ जून २०१३ रोजी तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. आत्महत्येनंतर तिच्या घरातून सहा पानी सुसाइड नोट सापडली होती. “आता गमावण्यासारखे काही उरले नाही म्हणूनच सर्व काही सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. असो, मी आधीच सर्व काही गमावले आहे. जर तू हे वाचत असशील तर याचा अर्थ असा आहे की मी निघून आहे किंवा जाण्याच्या तयारीत आहे. मी आतून तुटले आहे. तुझ्या प्रेमात मी स्वतःला पूर्णपणे विसरले, पण तूच मला त्रास देत राहिलास. मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, स्वतःला विसरले, पण तू मला उद्ध्वस्त केलंस. आता मला माझ्या आयुष्यात प्रकाश दिसत नाही. सकाळी डोळे उघडले की बेडवरून उठावेसे वाटत नाही. मी माझं भविष्य तुझ्याबरोबर पाहायचे, आपण एकत्र राहू अशी आशा मला होती. पण तू सगळं उद्ध्वस्त केलंस,” असं जियाने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.
सुरुवातीला या प्रकरणाकडे आत्महत्या म्हणून दुर्लक्ष करण्यात येत होते, पण नंतर जियाच्या आईने मुलीच्या प्रियकर सूरज पांचोलीवर हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर कोर्टानेही सूरजला जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.