बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातून न्यायालयाकडून अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने आज(२८ एप्रिल) या प्रकरणातील अंतिम निकाल दिला. तब्बल १० वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून अभिनेता आदित्य पांचोलीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याची आई व अभिनेत्री जरीना वाहिब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सत्यमेव जयते…देव महान आहे. आपल्या न्यायव्यवस्थेवर माझा सुरुवातीपासूनच विश्वास होता. माझ्या मुलासाठी ही १० वर्ष खूप वेदनादायी होती. यामुळे सूरजच्या हातातून अनेक प्रोजेक्ट गेले आहेत. आता तो सामान्य जीवन जगू शकतो. पण ही १० वर्ष त्याला परत कोण आणून देणार?” असं जरीना म्हणाल्या.
नेमकं प्रकरण काय?
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री जिया खानने २५ व्या वर्षी गळफास घेत आयुष्य संपवलं. ३ जून २०१३ साली जियाने तिच्या जुहूमधील राहत्या घरी आत्महत्या केली. जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड व अभिनेता सूरज पांचोलीवर लावण्यात आला होता.
जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. २० एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी आज न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. “पुराव्यांअभावी सूरज दोषी नसल्याचं सिद्ध झालंय,” असं विशेष सीबीआय न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितलं.