प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री जिया खानने अवघ्या २५ व्या वर्षी तिने गळफास घेत आयुष्य संपवलं. ३ जून २०१३ साली जियाने तिच्या जुहूमधील राहत्या घरी आत्महत्या केली. जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड व अभिनेता सूरज पांचोलीवर लावण्यात आला होता. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी सूरज पांचोलीची आई आणि अभिनेत्री जरीना वहाब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जरीना वहाब यांनी नुकतंच याप्रकरणी ई टाईम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी “माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी मी माझ्या मुलाबरोबर कोर्टात हजर असेन. मला देवावर पूर्ण विश्वास आहे”, असे म्हटले.
आणखी वाचा : “संपूर्ण जग…”, जिया खान आत्महत्या प्रकरणावरील सुनावणीपूर्वी सूरज पांचोलीची ‘ती’ पोस्ट व्हायरल
“जिया खान आत्महत्येप्रकरणी २८ एप्रिलला निकाल येणार आहे. आम्ही या निकालासाठी दहा वर्षे वाट पाहिली. या प्रकरणाने माझ्या मुलाचे आयु्ष्य नरकासारखे झाले आहे. माझ्या मुलासाठी ही १० वर्ष एखाद्या वाईट स्वप्नासारखीच आहेत. गेल्या १० वर्षांपासून आम्ही देवाकडे सूरजला न्याय मिळावा यासाठी प्रार्थना करत आहोत”, असेही जरीना वहाब यांनी सांगितले.
“जेव्हा माझा मुलगा माझ्याकडे पाहतो, तेव्हा मला त्याची वेदना जाणवते. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहता येत नाही. आम्ही या प्रकरणाबद्दल जास्त बोलत नाही. पण मला त्याला होणारा त्रास समजतो. तो आता कोणत्या स्थितीतून जात आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. मला कधीकधी खरंच असहय्य वाटते. पण मी काहीच बोलू शकत नाही”, असेही त्या म्हणाल्या.
“माझा मुलगा निर्दोष आहे याची मला पूर्ण खात्री आहे. पण आता दहा वर्ष झाली आहेत. पण ही वेळही निघून जाईल. ‘भगवान के घर देर है, अंधेर नहीं’. त्यामुळे माझ्या मुलाला न्याय मिळेल, यावर मला पूर्ण विश्वास आहे. त्याच्यासाठी प्रार्थना करा”, असे जरीना वहाब यांनी म्हटले.