अभिनेता जिमी शेरगिलने ‘माचीस’ चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण केलं होतं. पण आदित्य चोप्राच्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने त्याला ओळख मिळवून दिली. जिमी इंडस्ट्रीमधील ‘चॉकलेट बॉय’ होता. पण त्याला फक्त एकाच धाटणीच्या भूमिका करायच्या नव्हत्या. त्यामुळे त्याने काही निर्मात्यांना चित्रपटास नकार देत पैसे परत केले, असं जिमीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
जिमी म्हणाला की अनेक लोक त्याला त्याच्या आकर्षक दिसण्याचा फायदा करून घेण्यास सांगत होते, पण त्याला ‘चॉकलेट बॉय’च्या भूमिका करण्याव्यतिरिक्त इतरही भूमिका करायच्या होत्या. कारण त्याच प्रकारच्या भूमिका त्याला जास्त काळ टिकू देणार नाहीत, असं त्याला वाटत होतं. “पहिली दोन वर्षे खूप काम केल्यानंतर मी अनेकांना पैसे परत केले कारण मला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यावेळी ही चॉकलेट बॉय गोष्ट जरा जास्तच झाली होती. सगळे म्हणायचे, ‘तू हे का करत नाहीस? हे खूप चांगलं आहे’ आणि मी म्हणायचो ‘नाही, माझ्या आत कोणीतरी आहे जे मला मला सांगतंय की हे २-३ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही’. त्याच काळात ‘मुन्ना भाई’, ‘हासील’, ‘यहां’ सारखे चित्रपट माझ्याकडे आले, या चित्रपटांनी मला वेगळी प्रतिमा बनवण्यास मदत केली. यामुळे मी एकाच धाटणीच्या चित्रपटात अडकून राहिलो नाही,” असं जिमी ‘बॉलीवूड बबल’शी बोलताना म्हणाला.
१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…
जिमी शेरगिल जन्माने शीख आहे. त्याचं जन्माचं नाव जसजीत सिंग गिल आहे. शीख पुरुष केस कापत नाहीत. पण जिमीने १८ वर्षांचा असताना केस कापले होते. या निर्णयामुळे त्याच्या आणि त्याच्या पालकांमध्ये काही तणाव निर्माण झाला होता. “लहान असताना आपण चुका करतो, मीही काही चुका केल्या,” असं जिमीने सांगितलं.
खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या
जिमी म्हणाला की पालकांनी आपल्याशी न बोलण्यापेक्षा अधिक त्रासदायक काहीही नाही. जवळपास दीड वर्षांनी त्याच्या पालकांनी त्याला माफ केलं. “कदाचित ते नशिबात असेल आणि ते तुम्ही ठरवलेल्या गोष्टींपेक्षा जास्त वेगाने, घडतं. तेव्हा मी या इंडस्ट्रीत येईन असं मला वाटलं नव्हतं पण कदाचित हेच माझ्यासाठी लिहिलं होतं. तुम्ही याला चूक म्हणा, घटना म्हणा किंवा अपघात म्हणा. या गोष्टी घडल्या आणि मी इथे येऊन पोहोचलो.” केस कापल्यानंतर कुटुंबिय दीड वर्ष बोलले नव्हते, असा खुलासा जिमीने केला.