ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जितेंद्र यांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता, पण ते लहान असतानाच कुटुंबाबरोबर मुंबईला आले होते. ते मुंबईतील गिरगाव परिसरात राहत होते. त्यांचे पहिले घर आताच्या राजा राममोहन रॉय मार्गावर होते. त्या चाळीत त्यांची लहानशी खोली होती. जितेंद्र यांनी आता गिरगावातील जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.
३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…”
आयुष्याची १९ वर्षे त्यांनी गिरगावातील घरात घालवली. “ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. तेव्हा लहान लहान गोष्टीत आनंद वाटायचा, त्या मैत्रीत आनंद होता. तेव्हा जवळ काहीच नव्हतं, पण खूप काही असल्याचं समाधान होतं. आय़ुष्यातील सुरुवातीचे १९ वर्षे मिळालेलं समाधान आणि आनंद आयुष्यात परत कधीच नाही मिळाला,” असं जितेंद्र म्हणाले.
“मी गेल्या ३० वर्षांपासून ज्या राहतोय, त्या घराच्या शेजारी कोण राहतं, हे मला अजूनपर्यंत माहीत नाही. गिरगावात राहत असताना माझ्या घरात ट्युबलाइट आणि पंखा लावला, त्यावेळी इंग्रजी ब्रँडचा पंखा म्हणजे मोठी गोष्ट होती. तो फॅन बघायला सगळे घरी आले होते. त्याकाळी लोकांना कौतुक होतं. आमचं घर पाहायला आलेत म्हणून आम्हीही रुबाबात उभे असायचो. तेव्हा कुठल्याही गोष्टींची कमतरता जाणवलीच नाही, कारण जे नसायचं ते शेजाऱ्यांकडून घेता यायचं नंतर परत करायचो,” असं जितेंद्र ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
“मी गिरगावं सोडलं तेव्हा १९ वर्षांचा होतो. तिथून आम्ही कुलाब्याला राहायला गेलो होतो. गिरगावातील खोली विकली होती, त्या खोलीचे वडिलांना ३-४ हजार रुपये मिळाले. त्यानंतर कुलाब्यात ७-८ हजारात आम्ही लहान फ्लॅट घेतला. खोली १२० चौरसफुटांची होती, तर फ्लॅट ४५० चौरसफुटांचा होता. माझी आई ते घर पाहून मला म्हणाली, ‘अरे रवी हे तर क्रिकेटचं मैदान झालं.’ तेव्हा त्या लहान लहान गोष्टीत आनंद मिळायचा, गरजा कमी होत्या,” अशा आठवणी जितेंद्र यांनी सांगितल्या.