JNU Film Poster Launch: बॉलिवूडमध्ये सध्या राष्ट्रवादी विचारधारेला जोड देणाऱ्या चित्रपटांची चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’पासून अशा ज्वलंत विषयांवर वेगवेगळे चित्रपट आपल्यासमोर आले आहेत. ‘द केरला स्टोरी’पासून ‘आर्टिकल ३७०’ पर्यंतच्या संवेदनशील विषयांवर चित्रपट प्रदर्शित झाले अन् त्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. लवकरच आता ‘बस्तर : द नक्षल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळाच इतिहास लोकांसमोर येणार आहे.
अशातच आता आणखी एका वादग्रस्त विषयावर बेतलेल्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. ‘मकाहाल मुव्हीज’ आणि ‘झी म्युझिक’ लवकरच ‘जेएनयू (जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटि)’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित झालं असून या पोस्टरमध्ये भगव्या रंगात भारताचा संपूर्ण नकाशा पाहायला मिळत आहे अन् हा देशाचा नकाशा एका हातात बंदी असल्यासारखा पकडल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
आणखी वाचा : “आम्ही सलमानसारखे यशस्वी…”, घराणेशाहीबद्दल अरबाज व सोहेल खान प्रथमच स्पष्ट बोलले
दिल्लीच्या ‘जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी’वर हा चित्रपट बेतलेला असण्याची शक्यता आहे. एकूणच भारताच्या राजकारणात या विद्यापीठाचा असलेला समावेश, उजव्या आणि डाव्या विचारसारणीच्या लोकांमध्ये होणारे तणाव आणि यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या याचं केंद्रस्थान बनलेल्या ‘जेएनयू’बद्दल हा चित्रपट भाष्य करणार असल्याचं स्पष्ट होत आहे. एकूणच या विद्यापीठातून देशाचे तुकडे करण्याचा कशाप्रकारे प्रचार झाला अन् त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी उघडकीस आल्या या सगळ्या गोष्टींवर हा चित्रपट प्रकाश टाकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
चित्रपटाचे नावदेखील ‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ असे ठेवण्यात आले आहे. हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, “शिक्षणाच्या बंद दारवाज्यामागे या राष्ट्राला उजव्या आणि डाव्या अशा दोन विचारधारांत विभागण्याचा कट शिजला, ही लढाई नेमकी कोण जिंकणार?” प्रतिमा दत्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून विनय शर्मा ह्यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. अद्याप चित्रपटातील कलाकारांबद्दल माहिती समोर आली नसली तरी ‘व्हायरल भयानी’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटात रवी किशन उर्वशी रौतेला, पीयूष मिश्रा, सिद्धार्थ बोडके, विजय राज, सोनाली सहगलसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.