John Abraham on Pan Masala Advertisement: बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने गुटखा व पान मसाल्यांची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. आतापर्यंत आघाडीच्या अनेक अभिनेत्यांनी पान मसाला व गुटख्यांच्या जाहिराती केल्या आहेत. अक्षय कुमारनेही ही जाहिरात केली होती, त्यानंतर वाद झाला होता व अक्षयने माफीही मागितली होती. आता जॉनने अशा जाहिराती करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
अभिनेता जॉन अब्राहमने पान मसाला व गुटख्याच्या जाहिराती करणाऱ्या चित्रपटसृष्टीतील आपल्या सहकारी कलाकारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पान मसाल्याची जाहिरात करणारे अभिनेते बरेच अभिनेते ट्रोल झाले व नंतर त्यांनी जाहिराती करणार नसल्याचं म्हटलं. अजय देवगण, शाहरुख खान, टायगर श्रॉफ पान मसाल्याची जाहिरात करतात, तर अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी ट्रोलिंगनंतर अशा जाहिरातींमधून काढता पाय घेतला.
“लेखन ही कला थोडीच आहे?” मराठी कलाकार संतापले; म्हणाले, “स्टेजवर भाषणं देणाऱ्या नेत्यांना…”
जॉन अब्राहम सध्या त्याच्या आगामी ‘वेदा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानिमित्त रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये त्याने पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल प्रतिक्रिया दिली. याची जाहिरात करणारे लोक मृत्यू विकत असल्याचं वक्तव्य त्याने केलं. तसेच आपण कधीच अशा जाहिराती करणार नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.
जॉन अब्राहम म्हणाला, “जर मी माझे आयुष्य प्रामाणिकपणे जगलो आणि मी जे बोलतो ते आचरणात आणले तरच मी एक आदर्श व्यक्ती आहे. पण मी लोकांसमोर स्वत:चे एक वेगळेच रुप दाखवत असेन आणि नंतर एक वेगळीच व्यक्ती असल्यासारखं वागत असेल तर लोक ते कधी ना कधी ओळखतील. जे लोक फिटनेसबद्दल बोलतात तेच पान मसाल्याचा प्रचार करतात.”
जॉन म्हणाला, “मी माझ्या सर्व कलाकार मित्रांवर प्रेम करतो आणि मी त्यांच्यापैकी कोणाचाही अनादर करत नाहीये. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी माझ्याबद्दल बोलत आहे. मी कधीच मृत्यू विकणार नाही. पान मसाला उद्योगाची वार्षिक उलाढाल ४५ हजार कोटी रुपये आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? याचा अर्थ सरकारही या उद्योगाला पाठीशी घालत आहे आणि त्यामुळेच ते बेकायदेशीर नाही. पण तुम्ही मृत्यू विकताय. तुम्ही कसे जगू शकता?”
पान मसाला आणि गुटख्याच्या ब्रँडचा प्रचार केल्यामुळे अभिनेता अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्यावर खूप टीका झाली होती. त्यानंतर अक्षयने या जाहिरातीपासून काढता पाय घेतला व चाहत्यांची माफीही मागितली होती.