अभिनेता जॉन अब्राहम(John Abraham) हा त्याच्या अॅक्शन फिल्मसाठी ओळखला जातो. ‘धूम’, ‘रेस २’, ‘करम’, ‘जिंदा’ अशा अनेक चित्रपटांसाठी अभिनेता ओळखला जातो. तसेच ‘सत्यमेव जयते २’, ‘वो भी दिन थे’, ‘पठाण’, या चित्रपटांतील जॉन अब्राहमच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले. आता अभिनेता त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. शिवम नायर दिग्दर्शित ‘द डिप्लोमॅट'(The Diplomat) या चित्रपटाला प्रेक्षकांचा पहिल्या दोन दिवसांत उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. आता तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली आहे, याबद्दल जाणून घेऊ.
जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला द डिप्लोमॅट हा चित्रपट १४ मार्च म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित झाला. ‘सॅल्कनिक’नुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने चार कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ४.६५ कोटींची कमाई केली; तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने ४.६५ कोटींची कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने एकूण १३.३० कोटींची कमाई केली आहे.
जॉन अब्राहमच्या ‘द डिप्लोमॅट’ने इमर्जन्सीसह ‘या’ चित्रपटांना टाकले मागे
२०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटांपेक्षा ‘द डिप्लोमॅट’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात इतर चित्रपटांपेक्षा जॉन अब्राहमच्या चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे दिसत आहे. ‘क्रेझी’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ३.७५ कोटींची कमाई केली आहे. ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ चित्रपटाने १.८२ कोटींची कमाई केली होती. ‘मेरे हसबंड की बीवी’ने ४.४५ कोटींची कमाई केली होती. ‘लव्हयापा’ने ४.५५ कोटी तर ‘इमर्जन्सी’ने १०.३५ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे ‘द डिप्लोमॅट’ने १३.३० कोटींसह या चित्रपटांच्या तुलनेत अधिक कमाई करीत या सिनेमांना मागे टाकल्याचे दिसत आहे.
१४ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. आजही हा चित्रपट सिनेमांगृहामध्ये चालत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाने ७०० कोटींहून अधिक कमाई केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, द डिप्लोमॅट हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. भारतीय राजदूत जे. पी. सिंग आणि उज्मा अहमद यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. जॉन अब्राहमबरोबरच या चित्रपटात सादिया, प्राप्ती शुक्ला, जगजित संधू, कुमुद मिश्रा, राम गोपाल बजाज हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसत आहेत.