बॉलीवूड इंडस्ट्री असो वा मराठी इंडस्ट्री… या क्षेत्रात काम करताना अनेक कलाकार मंडळींना कधी ना कधी त्यांच्या दिसण्यामुळे ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो. मुख्यत: या क्षेत्रात काम करताना अनेक महिला कलाकारांना अशा घटनांचा अधिक सामना करावा लागतो. असंच एका कलाकाराबरोबरही झालं होतं आणि ही कलाकार म्हणजे बॉलीवूडमधील लोकप्रिय व विनोदी अभिनेते जॉनी लिवर (Johnny Lever) यांची मुलगी जेमी लिवर (Jamie Lever). जेमीला तिच्या लूकमुळे नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता.
जॉनी लिवर यांनी आजवर अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या विनोदी भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी जेमी लिवर हिनं या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. मात्र, इतर स्टार किड्सप्रमाणे तिला अगदी सहज प्रसिद्धी मिळालेली नाही. ती संघर्ष करीत या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, तिच्या दिसण्यामुळे तिला खूप त्रास झाला होता आणि यामुळे तिच्यावर टीकाही झाली होती.
जेमी लिवरनं अलीकडेच टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिनं काही वर्षांत लोकांच्या मताचा आणि टीकेचा कसा सामना केला आणि याचा तिच्यावर कसा परिणाम झाला याबद्दल सांगितलं. त्याबद्दल जेमी म्हणाली, “एके दिवशी मी फोटोशूट करीत होती आणि मेकअप आर्टिस्टने सांगितलं की, माझं नाक खूप मोठं असल्यानं ते कापावं लागेल. असं वाटतं की, तू कधीच चांगली दिसणार नाहीस.”
त्याशिवाय जेमीनं हेही सांगितलं की, तिला लहानपणी लठ्ठपणाचा सामना करावा लागला. तिला पीसीओएस असल्यानं वजन कमी करणं सोपं नव्हतं. त्यामुळे तिला असंही सांगण्यात आलं की, मोठी कंबर असणं चांगलं नाही. म्हणूनच ती नेहमीच तिचं शरीर झाकून ठेवत असे. त्याबद्दल ती म्हणाली, “मला नेहमीच सांगितलं जायचं की मोठे कंबर असणं लज्जास्पद असतं आणि तुम्हाला ते झाकावी लागते. त्यामुळे लहानपणी मी नेहमीच माझं कंबरेखालचं शरीर लांब टी-शर्ट आणि कुर्तीनं झाकून ठेवत असे.”
पुढे ती म्हणाली, “माझ्याकडे एकसारख्या कपड्यांचंच कपाट होतं आणि हे सुंदर आहे हे समजण्यासाठी मला बरीच वर्षं लागली. मला माझं शरीर सुंदर आहे आणि असं शरीर असावं, अशी अनेकांची इच्छा असते हे समजायला बराच काळ लागला. काही काळानंतर लोकांनी माझं, माझ्या शरीराचं कौतुक केलं; पण तरीही मला माझ्या शरीराबद्दल आश्वासक वाटण्यासाठी खूप वेळ लागला”.