बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रोसेनजीत चॅटर्जी हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. बंगाली चित्रपटात त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहेच. याबरोबरच आता ते हिंदी चित्रपटसृष्टीतही चांगल्या भूमिका साकारताना दिसत आहेत. नुकतंच प्रोसेनजीत ‘जुबिली’ आणि ‘स्कूप’ या दोन्ही वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.
या दोन्ही वेब सीरिजमधील प्रोसेनजीत चॅटर्जी यांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं आणि बऱ्याच प्रेक्षकांपर्यंत त्यांचं काम पोहोचलं. याचनिमित्त त्यांनी यूट्यूबच्या ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल सविस्तरपणे भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये त्यांनी एका वर्षात तब्बल २० चित्रपटांत काम केल्याचा अनुभव सांगितला आहे.
आणखी वाचा : नसीरुद्दीन शाह यांना काँग्रेसने दिलेली ‘ही’ ऑफर; मुलाखतीदरम्यान अभिनेत्याचा खुलासा
याविषयी बोलताना प्रोसेनजीत म्हणाले, “२००४ मध्ये माझ्या हातात तब्बल २२ चित्रपट होते. दरवर्षीच सरासरी मी १० ते १२ चित्रपटांत काम करतो. दिवसाला मी तीन शिफ्ट्समध्ये काम केलं आहे. माझी शेवटची शिफ्ट पहाटे २ वाजता असते. एके काळी याबद्दल वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर बातमी छापली जायची. मी कोलकातामध्ये जरी चित्रीकरण करीत असलो तरी मी सलग नऊ दिवस घरी जायचो नाही. मी स्टुडिओमध्ये खायचो आणि राहायचो.”
पुढे ते म्हणाले, “त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन हा प्रकार नव्हता. तेव्हा मी माझ्या कारच्या टपावरच झोपायचो. तिथल्याच एका चहाच्या टपरीवर मी चहा प्यायचो.” प्रोसेनजीत चॅटर्जी यांचं ‘स्कूप’ या वेब सीरिजमधील जयदेब सेन हे पात्र लोकांना चांगलंच पसंत पडलं. या वेब सीरिजमध्ये त्यांच्याबरोबर झीशान अयुब खान, करिश्मा तन्ना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.