Raj Babbar-Nadira : अभिनेते राज बब्बर त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले. राज लग्नानंतर प्रेमात पडले होते आणि घटस्फोट न घेता त्यांनी स्मिता पाटील यांच्याशी दुसरं लग्न केलं. राज यांचं पहिलं लग्न नादिरा बब्बरशी झालं होतं. राज बब्बर सिनेसृष्टीत संघर्ष करत होते, तेव्हा त्यांची भेट नादिराशी झाली होती आणि दोघांनी १९७५ साली लग्न केलं होतं. राज बब्बर हिंदू होते व नादिरा मुस्लीम होती. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, पण त्यांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होता.
नादिराने हिंदू धर्म स्वीकारावा अशी राज बब्बर यांच्या कुटुंबाची इच्छा होती. पण, राज यांनी या निर्णयाला विरोध केला. त्यांच्या वडिलांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यामुळे नादिराने तिची मुस्लीम ओळख कायम ठेवली.
नादिरा यांना नाव बदलण्याचा दिलेला सल्ला
राज बब्बर आणि नादिरा यांची मुलगी जुही बब्बर हिने याबाबत नुकताच खुलासा केला आहे. लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत जुहीने त्याच्या आई-वडिलांच्या नातेसंबंधाबद्दल आणि तिच्या कौटुंबिक मूल्यांबद्दल सांगितलं. जुही म्हणाली, “माझ्या वडिलांच्या कुटुंबाने सुरुवातीला आई नादिराने निर्मला किंवा निर्देश असे हिंदू नाव बदलण्याचा सल्ला दिला होता, पण आजोबांनी त्याला विरोध केला. आम्ही भारतीयत्वाचे प्रतीक आहोत. आता आम्ही फक्त एका ख्रिश्चन मुलीची वाट पाहत आहोत, जेणेकरून आमच्या घरात सर्व धर्मांचे प्रतिनिधी असतील.”
हेही वाचा – “ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
जुहीने सांगितलं की ती खूप सुंदर वातावरणात वाढली आहे. “आम्ही दिवाळी आणि ईद दोन्हीही सारख्याच उत्साहाने साजरे करतो. असा एकही सण नाही जेव्हा आमचे आई-वडील दोघेही उपस्थित नसतील. आमचे कुटुंब खूप धार्मिक आहे, असं मी म्हणणार नाही. पण आम्ही सांस्कृतिक आहोत. सर्व सण, वाढदिवस आणि नवीन वर्षी संपूर्ण कुटुंब एकत्र राहणे हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे. ३१ डिसेंबरला इतर लोक मित्रांसह बाहेर पार्टी करतात, पण तेव्हा आम्ही सगळे एकत्र घरी राहतो,” असं जुही म्हणाली.
धार्मिक कारणांमुळे राज आणि नादिरा यांच्यात कधी मतभेद झाले का? असं विचारल्यावर जुहीने नकार दिला. तिने त्यांच्या प्रेमळ नातेसंबंधाचे श्रेय आदर आणि समंजसपणाला दिले. दरम्यान, नादिराशी प्रेमविवाह केल्यानंतरही राज बब्बर स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले आणि घटस्फोट न घेता लग्न केले. मात्र त्यांचा मुलगा प्रतीक बब्बरच्या जन्मानंतर काही दिवसांनी स्मिता यांचे निधन झाले. त्यानंतर राज बब्बर यांनी नादिराबरोबर संसार केला.