चित्रपटात दिसणाऱ्या कलाकारांची संपत्ती किती असेल, याबद्दल प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. ९० च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत कलाकार एका चित्रपटासाठी एक कोटी रुपयांचे मानधन घेत असत. त्यानंतर मानधनात वाढ झाली. अनेक कलाकारांनी व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता जगभरातील श्रीमंत कलाकारांमध्ये भारतीय कलाकारांचीदेखील वर्णी लागताना दिसते. जगभरातील टॉप १० श्रीमंत कलाकारांमध्ये ज्या अभिनेत्रीचे नाव आहे, ती जुही चावला(Juhi Chawla) आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दशकात या अभिनेत्रीचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला नाही.

९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्रीची संपत्ती आहे ४६०० कोटी

जुही चावला ही भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री आहे. २०२४ च्या ‘हुरून रिच लिस्ट’नुसार शाहरुख खाननंतर जुही दुसऱ्या क्रमांकावर आहे. शाहरुख खान आणि जुही यांनी ‘राजू बन गया जंटलमन’ (१९९२), ‘डर’ (१९९३), ‘जादू’ (१९९५), ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ (२०००), ‘भूतनाथ’ (२००८) अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. सहकलाकार असण्याबरोबरच ते दोघे मित्र असून, बिझनेस पार्टनरदेखील आहेत. ‘हुरून रिच लिस्ट’नुसार जुहीची ४,६०० कोटी रुपयांची संपत्ती आहे, जी इतर अभिनेत्रींपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे.

भारतात जुहीनंतर श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्या क्रमांकावर येते. ऐश्वर्याची ८५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा ६५० कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आलिया भट्ट दीपिका पदुकोण ‘टॉप ५’मध्ये येतात. त्यांचे स्वत:चे मोठे व्यवसाय आहेत.

दरम्यान, जुही चावला अभिनेत्री असण्याबरोबरच एक व्यावसायिकदेखील आहे. ८०-९० च्या दशकात एकापेक्षा एक चित्रपट करीत तिने सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. २००९ मध्ये लक बाय चान्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. मात्र, त्यानंतर या अभिनेत्रीने व्यवसायावर लक्ष केंद्रित केले.

हेही वाचा: “मुलांची खूप आठवण…”, पत्नीपासून विभक्त झाल्याच्या चर्चा सुरू असतानाच फरदीन खानचे वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “त्यांच्या दैनंदिन जीवनाचा…”

रेड चिलीज ग्रुपमध्ये शाहरुख खान आणि जुही चावला व्यावसायिक भागीदार आहेत. त्याबरोबरच आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या टीमचेदेखील शाहरुख खान, जुही चावला व तिचा पती जय मेहता हे भागीदार आहेत. जुहीचे पती जय मेहता उद्योजक असून त्यांच्याबरोबर तिने अनेक इतर कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे.