अभिनेत्री जुही चावला(Juhi Chawala) ही तिच्या अभिनयासाठी, उत्तमोत्तम चित्रपटांसाठी ओळखली जाते. ८०-९०च्या दशकातील यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी जुही चावलाची ओळख आहे. अभिनयाशिवाय तिची यशस्वी उद्योजिका म्हणूनदेखील ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या हुरून रिच लिस्टनुसार जुही चावला ही भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री ठरल्याचे पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटांपासून दूर असूनही कसे कमावते पैसे?

जगभरातील टॉप १० श्रीमंत कलाकारांमध्ये ज्या अभिनेत्रीचे नाव आहे, ती जुही चावला आहे. ‘हुरून रिच लिस्ट’नुसार जुहीची ४,६०० कोटी रुपयांची संपत्ती आहे, जी ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण या लोकप्रिय अभिनेत्रींपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. २००९ पासून जूही चावलाचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला नाही. २००० पासून अभिनेत्रीने चित्रपटात काम करणे कमी केले असले तरी तिने उद्योग-व्यवसायात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ती आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या टीमची आणि रेड चिलीज या ग्रुपची पती जय मेहता आणि अभिनेता शाहरुख खानबरोबर भागीदार आहे.

ईटीसी बॉलीवूड( ETC Bollywood)ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत जुही चावलाने तिच्या शाळेतील एक आठवण सांगताना म्हटलेले, “जेव्हा मी लहान होते, त्यावेळी आम्हाला विचारले गेले होते की, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, त्यावेळी तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे?; त्यावेळी चित्रपटांमुळे प्रसिद्धी मिळते हे माहीत होते. तर मी वहीत लिहिले, “आनंदी, आरोग्यदायी, श्रीमंत आणि प्रसिद्ध व्हायचे आहे.” हे जेव्हा माझ्या मित्रांनी बघितले तेव्हा त्यांनी मला खूप चिडवले. त्यांनी मला विचारले की, तू श्रीमंत आणि प्रसिद्ध कशी होणार? मला याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. मी तेव्हा सहावीत किंवा सातवीत असेन. पण बघा, मला ती संधी मिळाली. कॉलेजमधील एका साध्या फॅशन शोने मला मिस इंडियाच्या स्पर्धेपर्यंत नेऊन पोहचवले. माझ्या पालकांसाठीदेखील तो धक्का होता.

मिस इंडिया स्पर्धेत जुही चावला सहज सहभागी झाली होती; मात्र त्या स्पर्धेची ती विजेती ठरली आणि तिला अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रातही काम करण्याची संधी मिळाली. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर जुही चावलाला कयामत से कयामत तक, हम है राही प्यार के, येस बॉस, बोल राधा बोल अशा चित्रपटांतून अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली.

जुही चावलाला चित्रपटांचे मानधन मिळते. मात्र, तिच्या संपत्तीत महत्त्वाचा वाटा हा तिच्या व्यवसायाचा आहे. ती शाहरुख खानच्या रेड चिलीज ग्रुपची भागीदार आहे. त्याबरोबरच ती अनेक क्रिकेट संघांची मालकीण आहे आणि त्यामध्ये कोलकाता नाईट राइडर्सचादेखील समावेश आहे. ही टीम २००७ ला शाहरुख खान, जुही चावला व तिचा पती जय मेहता यांनी ७५.०९ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ६२३ कोटी रुपयांना विकत घेतली होती. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या टीमची किंमत १.१ बिलियन डॉलर्स म्हणजे ९,१३९ कोटी रुपये इतकी आहे.

याआधी जुही चावला आणि शाहरुख खानने २००१ साली ड्रीम्ज अनलिमिटेड (Dreamz Unlimited) ही प्रॉडक्शन कंपनी सुरू केली होती. या प्रॉडक्शनअंतर्गत त्यांनी तीन चित्रपटदेखील प्रदर्शित केले; मात्र त्यांच्यातील मतभेदांमुळे ते वेगळे झाले. या सगळ्याबरोबर जुही चावला सौराष्ट्र सिमेंट लिमिटेड या कंपनीत भागीदार आहे. ही कंपनी तिचा पती जय मेहता यांची आहे. या जोडप्याचे दोन रेस्टॉरंट्सदेखील आहेत. जुही चावला तिच्या पतीबरोबर रिअल इस्टेटमध्येदेखील गुंतवणूक करीत असते.

हेही वाचा: ‘प्रेमाची गोष्ट’मधून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट! आता हर्षवर्धनच्या भूमिकेत झळकणार ‘हा’ कलाकार, मालिकेत आहे मोठा ट्विस्ट

दरम्यान, अभिनेत्री मॅगी, पेप्सी, कुरकुरे, अशोक लोणचे, केशकिंग आयुर्वेदिक तेल, इमामी बोरोप्लस अशा अनेक उत्पादनांची ती ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसॅडर आहे. त्याबरोबरच जुही चावला ‘झलक दिख ला जा’ या शोची परीक्षकदेखील होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juhi chawla is richest actress in bollywood how she earn money know what is the source of income nsp