जुही चावला आणि माधुरी दीक्षित ९० च्या दशकातील बॉलीवूडमधील सर्वात आघाडीच्या अभिनेत्री होत्या. दोघींनी एकाचवेळी करिअरला सुरुवात केली, आणि त्यांना यशही एकत्रच मिळालं. दोघीही आघाडीच्या अभिनेत्री असल्याने त्यांची तुलनाही खूप व्हायची. एकदा तर जुहीने माधुरीबद्दल असलेल्या ‘इगो प्रॉब्लेम’मुळे यश चोप्रांचा चित्रपट नाकारला होता. खुद्द जूहीने याबद्दल सांगितलं आहे.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत जुही म्हणाली, “आम्ही आमच्या करिअरची सुरुवात एकाच वेळी केली होती. तिला ‘तेजाब’ चित्रपट मिळाला आणि त्याच वर्षी माझ्याकडे ‘कयामत से कयामत’ तक होता. आमच्या संपूर्ण करिअरमध्ये नेहमीच आमची एकमेकींशी तुलना झाली. त्यामुळे आमच्यापैकी कोणीतरी पहिल्या क्रमांकावर आहे किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे असं सतत म्हटलं जायचं. बरेच दिवस असं चालू होतं.”
यश चोप्रांनी जूहीला ‘दिल तो पागल है’ची ऑफर दिली होती, पण तिला ऑफर करण्यात आलेली भूमिका सहायक होती, ते तिला आवडलं नाही आणि तिने चित्रपट नाकारला. “मी ‘डर’मध्ये यशजींबरोबर काम केल्यानंतर त्यांना ‘दिल तो पागल है’ बनवायचा होता आणि त्यांना माधुरी दीक्षितबरोबर काम करायचं होतं. त्यामुळे मला दुसरी सहायक भूमिका करायला सांगितली. त्यावेळी मला असं वाटलं की ‘मी ही भूमिका करावी का?’ मला असुरक्षित वाटत होतं, मला इगो प्रॉब्लेम होता त्यामुळे मी तो चित्रपट केला नाही. आम्हाला एकत्र काम करायची ती एकमेव संधी होती,” असं जूही म्हणाली. जूहीला ऑफर करण्यात आलेली भूमिका नंतर करिश्मा कपूरने केली होती, तिला या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात शाहरुख खानचीही महत्त्वाची भूमिका होती.
जुही व माधुरीने २०१४ च्या ‘गुलाब गँग’मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यावेळी माधुरी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती की तिने जुहीकडे कधीच आपली प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं नाही. “मी तिला कधीच माझी प्रतिस्पर्धी समजलं नाही. मी कधीच कुणाबरोबर काम करण्याबद्दल फार विचार केला नाही. मला वाटतं की आपण कलाकार आहोत त्यामुळे स्पर्धेतील घोडे नाहीत जे स्पर्धा संपवण्यासाठी धावतात. हे एक क्रिएटिव्ह क्षेत्र आहे. आपल्याला काही भूमिका आवडतात आणि आपल्याला काही लोकांबरोबर काम करायला आवडतं इतकंच. मी यापूर्वी दोन-हिरोईन असलेल्या प्रोजेक्टमध्ये काम केलं नाही, असं अजिबात नाही. मी प्रीती झिंटा (ये रास्ते हैं प्यार के), ऐश्वर्या राय (देवदास) आणि करिश्मा कपूर (दिल तो पागल है) यांच्याबरोबर काम केलं आहे,” असं माधुरी म्हणाली होती.