रुपेरी पडद्यावरील काही जोड्या अशा आहेत ज्यांच्यावरील प्रेक्षकांचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच जाते. त्यातीलच एक म्हणजे बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान आणि अभिनेत्री जुही चावला ही जोडी होय. या जोडीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट एकत्र केले आहेत. ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘एस बॉस’, ‘डर’ , ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ अशा अनेक चित्रपटात त्यांनी सहकलाकार म्हणून काम केले आहे. इतकेच नाही, चित्रपटांच्या बाहेर आयपीएलमधील ‘कोलकाता नाईट रायडर्स’ संघाचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. आता नुकत्याच पार पडलेल्या गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री इव्हेंटमध्ये जुही चावलाने बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यावर तरुण शाहरुख खान कसा होता, कारकिर्दीच्या सुरूवातीला त्याने कसा आर्थिक संकटांचा सामना करत आज यशाचे शिखर गाठले आहे, याविषयी भाष्य केले आहे.

शाहरुख खानबद्दल बोलताना जुही चावला म्हणते- “जेव्हा शाहरुख सुरुवातीला दिल्लीहून मुंबईत आला तेव्हा त्याचा काळ संघर्षाचा होता. तो कुठे राहिला, काय केले माहीत नाही. तो युनिटबरोबर राहायचा, तिकडेच जेवायचा, युनिटमध्ये अखंडपणे मिसळायचा. त्यावेळी त्याने २-३ शिफ्ट्सही केल्या आहेत. माझ्याबरोबर ‘राजू बन गया जेंटलमेन’ आणि त्याचवेळी तो ‘दिल आशना है’ या चित्रपटाचे शूटिंग देखील करत होता आणि दिव्या भारतीबरोबर देखील एका चित्रपटाचे शूटिंग त्याचवेळी सुरू होते. काम करण्यासाठी त्याच्याकडे जिद्द असायची, आपल्या कामासाठी तो प्रेरित होता. नम्र होता.” पुढे बोलताना ती म्हणते- “मला आठवतं, त्याच्याकडे एक काळी जिप्सी होती आणि ती कर्ज काढून त्याने ती विकत घेतली असावी. पण त्याचे हप्ते तो भरु शकला नाही की इतर काही कारण होते पण एक दिवस त्याची ती गाडी उचलून घेऊन गेले. त्यादिवशी तो सेटवर फारच नाराज होता. त्यावेळी त्याला मी म्हटलं होतं की काळजी करु नकोस , एक दिवस असाही येईल ज्या दिवशी तुझ्याकडे अनेक गाड्या असतील आणि आता बघा तो कुठे पोहचला आहे.”

पुढे बोलताना जुही चावलाने शाहरुख बरोबरच्या पहिल्या चित्रपटाबद्दलची एक आठवणदेखील सांगितली आहे. ती म्हणते- ” माझा आणि शाहरुखचा पहिला एकत्र चित्रपट हा ‘राजू बन गया जेंटलमेन होता. मी देखील इंडस्ट्रीमध्ये नवीनच होते. त्यावेळी विवेक वासवानी यांनी मला अभिनेता कोण असणार हे वर्णन करुन सांगितले होते. त्यांनी मला सांगितले होते की, जो अभिनेता आहे तो सैनिक असून तो खूप प्रसिद्ध आहे. यात भर म्हणून मला त्यांनी सांगितले की तो आमिर खानसारखा दिसतो. त्यानंतर माझ्या मनात आमिर खानसारख्या दिसणाऱ्या अभिनेत्याची प्रतिमा तयार झाली. मी विवेक वासवानींना म्हटलं, का नाही करणार हा चित्रपट? नक्की करेन. पण ज्यावेळी शाहरुख माझ्यासमोर आला तेव्हा त्याला पाहून माझी निराशा झाली होती, असंही यावेळी जुहीने कबूल केले आहे. तपकिरी रंगाचा, सडपातळ, पांढरा शर्ट, मोठं नाक, मोठे ओठ असा तो एकंदरित दिसत होता. त्याला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं माझी फसवणूक झाली आहे. मी मनातच म्हटलं, हा कुठून आमिर खान सारखा दिसतो. महत्वाचे म्हणजे त्या नाराजीतच मी त्या चित्रपटाचे शूटिंग केले.” अशी आठवण सांगत असतानाच तिने “पण बघा त्यालासुद्धा मी स्टार बनवले” असे गंमतीत म्हटले आहे.

हेही वाचा: Video: आमिर खानचा जावई अन् विहीणबाईंची परदेशवारी, नुपूर शिखरेची आईसह थायलंडमध्ये धमाल, स्कुटीवर फिरले माय-लेक

पुढे बोलताना ती म्हणते- “शाहरुखबरोबर काम करण्याची एक वेगळी मजा होती. त्याने कधी स्वार्थीपणे काम केले नाही. तो सराव करायचा आणि कामात सुधारणा करायचा. दिग्दर्शक अनेकवेळा त्याच्यावर अवलंबून असायचे, ते म्हणायचे जेव्हा शाहरुख येईल तेव्हा शूटिंग अजून चांगले होईल. तो अनेक गोष्टी सूचवत राहायचा आणि त्यामुळे काम करताना मजा यायची,” असेही जुहीने म्हटले आहे.
दरम्यान, चित्रपटांशिवाय खऱ्या आयुष्यातदेखील शाहरुख खान आणि जुही चावलाची मैत्री आजही टिकून आहे.