‘डर’ हा सिनेमा २४ डिसेंबर १९९३ ला रिलिज झाला होता. या सिनेमात शाहरुख खान, सनी देओल, जुही चावला, अनुपम खेर अशी तगडी स्टार कास्ट होती. यश चोप्रांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. शाहरुख खान या सिनेमात ग्रे शेडमध्ये दिसला होता. किरण नावाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करणारा तरुण, तिच्या प्रेमात वेडा झालेला तरुण आणि तिच्यासाठी काहीही करु शकणारा माथेफिरु प्रेमी अशी भूमिका शाहरुखने केली होती. या सिनेमात शाहरुख अडखळत क-क-क किरण हा संवाद म्हणताना दाखवला आहे. या सिनेमातली शाहरुखची ही स्टाईल खूप लोकप्रिय झाली होती. आता जुहीने या सिनेमातल्या या संवादामागचं सिक्रेट काय ते सांगितलं आहे.

जुही चावला एके काळची हिट अभिनेत्री

जुही चावला ही अशी अभिनेत्री आहे जिने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. तसंच तिच्या सौंदर्याची भुरळही अनेकांना त्या काळात पडली आहे. १९८६ मध्ये सल्तनत या सिनेमातून जुहीने हिंदी चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९८८ मध्ये तिने आमिर खानसह कयामत से कयामत तक सिनेमा केला आणि ती रातोरात स्टार झाली. ९० च्या दशकात तिने एकाहून एक हिट चित्रपट दिले. आमिर खान आणि शाहरुख खानसह तिची जोडी हिट ठरली. जुही, सनी देओल आणि शाहरुख यांच्या भूमिका असलेला डर हा सिनेमा त्यावेळी चांगलाच चर्चेत आला होता.

हे पण वाचा- “शाहरुखला पाहिलं आणि मला वाटलं…”, जुही चावलाने सांगितला किंग खानबरोबरच्या पहिल्या चित्रपटाचा किस्सा

जुहीने काय सांगितलं क क क किरण संवादाबाबत?

जुही चावलाने नुकतीच गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात उपस्थित होती. या वेळी तिने ‘डर’ चित्रपटातील ‘क-क-किरण’ या प्रसिद्ध संवादाबाबत सांगितलं. शाहरुखने अडखळत डायलॉग म्हटला होता. शाहरुखच्या या अडखळण्याचे कारण यश चोप्रा होते. जुही चावलाने सांगितले की, यश चोप्रा यांना अडखळत बोलण्याची सवय होती. यश चोप्रा यांची ही सवय शाहरुखच्या लक्षात आली.त्यानंतर शूटिंगच्या दरम्यान शाहरुखने यश चोप्रांना तुमची ही बोलण्याची सवय मला या व्यक्तीरेखेसाठी वापरायची आहे असे सांगितले. शाहरुखने क-क-किरण हा डायलॉग शूट केला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा डायलॉग चांगलाच लोकप्रिय झाला.

शाहरुख आणि जुहीची जोडी कायम चर्चेत राहिली

शाहरुख खान आणि जुही यांची जोडी मोठ्या पडद्यावर हिट ठरली आहे. ‘राम जाने’, ‘येस बॉस’ ‘वन टू का फोर’, ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’, ‘राजू बन गया जंटलमन’ या चित्रपटांमध्ये जुही आणि शाहरुख यांनी काम केलं आहे. तसंच शाहरुखचा मुलगा आर्यन जेव्हा ड्रग्ज प्रकरणात अडकला होता तेव्हा त्याला जामीन देण्यासाठी जुही कोर्टात गेली होती. त्याची चांगलीच चर्चाही त्यावेळी झाली होती.