बॉलीवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्टचा पुत्र जुनैद खान सध्या त्याच्या ‘लवयापा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो आणि अभिनेत्री खुशी कपूर विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. त्यातील एका मुलाखतीमध्ये दोघांनाही त्यांच्या शालेय जीवनातील आयुष्यावर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी उत्तर देताना जुनैदने शाळेत असताना त्याला ‘डिस्लेक्सिया’ आजार होता, असं सांगितलं आहे.
‘डिस्लेक्सिया’ म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास शालेय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना सामान्य मुलांपेक्षा जास्त येणार्या अडचणी. “शाळेत असताना अनेकदा आपल्याला कमी गुण मिळतात. कमी गुण मिळाल्यावर घरातील आई आणि बाबा दोघेही आपल्यावर रागवतात आणि ओरडतात. तुमच्याबरोबर असं कधी झालं आहे का?”, असा प्रश्न जुनैदला आणि खुशीला विचारण्यात आला होता. त्यावर दोघांनीही नाही, असं उत्तर दिलं. तसेच जुनैदने पुढे, “मला अशी अडचण कधीच आली नाही. कारण- मला शाळेत असताना फार लवकरच ‘डिस्लेक्सिया’ झाला होता.”
तारे जमीन पर चित्रपटाची अशी झाली मदत
जुनैदने पुढे सांगितलं, “कमी वयात या आजाराची माहिती मिळाल्यानं माझ्या आई बाबांनी नेहमी मला साथ दिली. शाळेत असताना त्यांनी कधीही माझ्यावर अभ्यास आणि शिक्षणाचं ओझं ठेवलं नाही. ‘तारे जमीन पर’ चित्रपट आला तेव्हा मीसुद्धा लहान होतो. त्याची स्क्रिप्ट आई आणि बाबांनी वाचली होती. स्क्रिप्ट वाचताना त्यांच्या एकदम लक्षात आलं की, यातील मुलाला जो त्रास आहे, जी लक्षणं आहेत ती काहीशी आपल्या मुलालाही आहेत.”
स्वत:ला ठरवलं भाग्यशाली
“स्क्रिप्ट वाचल्यावर त्यांनी लगेचच मला रुग्णालयात नेलं आणि माझी तपासणी केली. त्यामध्ये मला ‘डिस्लेक्सिया’ आजार असल्याचं निदान झाले. त्यानंतर त्यांनी मला या आजाराच्या विशेषतज्ज्ञांकडे नेलं”, असं जुनैदनं सांगितलं. मुलाखतीत पुढे त्यानं स्वत:ला भाग्यशालीही म्हटलं. तो म्हणाला, “माझ्या या आजाराचं निदान फार कमी वयात झालं. त्यावेळी मी साधारण ६ वर्षांचा असेन. माझ्या आई-बाबांनी मला फार मदत केली. कदाचित त्यामुळे मोठा झाल्यावर माझ्यावर या आजाराचा जास्त प्रभाव राहिला नाही. आई आणि बाबांमुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजतो.”
दरम्यान, बॉलीवूडमधील ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट आणि त्यातील कथा प्रेक्षकांना फार आवडली होती. अनेक चाहते आजही आमिर खानचा हा चित्रपट आवडीनं पाहतात. त्यामध्ये एका लहान मुलाला शालेय शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी आणि मानसिक त्रास दाखवण्यात आला आहे.
तसेच जुनैद खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, २०२४ मध्ये आलेल्या ‘महाराज’ या चित्रपटातून त्यानं कामाला सुरुवात केली. या पहिल्या चित्रपटानंतर जुनैद ‘लवयापा’ या त्याच्या दुसऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात त्याच्यासह दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर मुख्य भूमिकेत आहे.