काही चित्रपट असे असतात, ज्यांचा प्रभाव प्रेक्षकांवर वर्षानुवर्षे पाहायला मिळतो. २००७ साली प्रदर्शित झालेला ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट हा त्यापैकी एक आहे. इशान नावाच्या एका लहान मुलाला शाळेत कमी मार्क्स मिळतात, म्हणून त्याचे वडील त्याला बोर्डिंग शाळेत पाठवतात. बोर्डिंग शाळेत राम नावाचे चित्रकलेच्या शिक्षकांना इशानला डिस्लेक्सिया(Dyslexia) हा आजार असल्याची जाणीव होते. इशानला चित्रकला उत्तम येते हे समजल्यानंतर ते त्याला मदत करतात. या चित्रपटात राम शंकर या शिक्षकाची भूमिका आमिर खान(Aamir Khan)ने निभावली होती. आता आमिर खानच्या मुलाने अभिनेता जुनैद खानने त्याला लहानपणी डिस्लेक्सिया हा आजार होता, असा खुलासा केला आहे.
‘तारे जमीन पर’ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर झालेली जाणीव
जुनैद खानने नुकतीच विकी लालवानीच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, त्याचे पालक त्याच्या अभ्यासाबाबत कठोरपणे वागायचे का? यावर बोलताना जुनैदने म्हटले, “माझ्या आई-वडिलांपैकी कधीच कोणीही अभ्यासाबाबत माझ्याशी कठोरपणे वागले नाही. कारण मी खूप लहान असताना मला डिस्लेक्सिया या आजाराचे निदान झाले होते, त्यामुळे त्यांनी खूप काळजी घेतली. ज्यावेळी मी शाळेत होतो, त्यावेळी ते कधीही कठोरपणे वागले नाहीत.”
पुढे त्याला विचारण्यात आले की, तुला निदान झालेल्या आजारपणामुळे आमिर खानला ‘तारे जमीन पर’ चित्रपट बनवण्यास प्रवृत्त केले का? याचे उत्तर देताना जुनैदने म्हटले, “थोडेसे वेगळे होते. त्यांनी जेव्हा तारे जमीन परची स्क्रीप्ट वाचली, त्यावेळी त्यांना याची जाणीव झाली की मी हे माझ्या घरी पाहिले आहे. त्यावेळी त्यांनी मला तज्ज्ञांकडे नेले व मला डिस्लेक्सिया असल्याचे निदान झाले. मी सहा किंवा सात वर्षांचा असताना हे झाले होते. अगदी लहान वयातच मला खूप मदत मिळाली, त्यामुळे मोठे झाल्यानंतर त्याचा मला त्रास जाणवला नाही. त्या दृष्टीने विचार करता मी खूप भाग्यवान होतो”, अशी आठवण जुनैद खानने सांगितली आहे.
जुनैद खानने ‘महाराजा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून जुनैदने सर्वांचे मन जिंकून घेतले. आता तो लवकरच खूशी कपूरबरोबर ‘लव्हयापा’ या चित्रपटात दिसणार आहे. याबरोबरच ‘एक दिन’ या चित्रपटात साई पल्लवीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.