आमिर खानचा मुलगा जुनैद खान सध्या त्याच्या ‘लवयापा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जुनैद सध्या त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. जुनैदला एका मुलाखतीत ओटीटी व थिएटरच्या वादाबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी त्याने त्याला त्याचा युट्यूबवर प्रदर्शित करायचा आहे, असं सांगितलं. पण तसं शक्य नसल्याचं त्याने नमूद केलं.
अलीकडच्या काळात बरेच चित्रपट थिएटरमध्ये न रिलीज करता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जातात. जुनैदचा पदार्पणाचा चित्रपटही ओटीटीवरच आला होता.
सिनेमा युट्यूबवर रिलीज करणं सर्वात योग्य – जुनैद खान
जुनैदला मुलाखतीत विचारण्यात आलं की ओटीटी आणि थिएटर्समधील या वादामुळे त्याला काही फरक पडतो का? यावर जुनैद म्हणाला, “मला दोन्हीत फार काही फरक दिसत नाही. मला वाटतं शेवटी चित्रपट हा चित्रपट असतो आणि तो आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतो. मी फक्त एक अभिनेता आहे. माझ्यासाठी, चित्रपट युट्यूबवर मोफत प्रदर्शित करणं सर्वात चांगला पर्याय आहे, जेणेकरून प्रत्येकजण तो पाहू शकेल. पण प्रत्यक्षात हे शक्य नाही.”
…तर जास्तीत जास्त लोक पाहतील चित्रपट
त्याचा चित्रपट यूट्यूबवर मोफत प्रदर्शित झाल्यास जास्तीत जास्त लोकांना त्याचा चित्रपट पाहता येईल, असा विश्वास जुनैदला आहे. मात्र, तो हा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांवर सोडत असल्याचं म्हणतो. “माझा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी माझी इच्छा आहे. मी हा निर्णय त्यांच्यावर सोडतोय, ज्यांना मार्केट माहीत आहे आणि अधिक लोकांपर्यंत कसे पोहोचायचे हे माहीत आहे,” असं जुनैद म्हणाला.
जुनैदच्या मते, ओटीटी आणि थिएटरमधील फरक कलाकारांना विचारणं चुकीचं आहे. याचे उत्तर चित्रपटाचे निर्माते आणि वितरक योग्य देऊ शकतात, कलाकारांसाठी माध्यम बदलल्याने फारसे बदल झालेले नाहीत.
जुनैद-खुशीचा आगामी चित्रपट ‘लवयापा’ हा दोघांचाही पहिला चित्रपट आहे, जो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी त्या दोघांचेही डेब्यू चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले होते. खुशीचा चित्रपट ‘द आर्चीज’ आणि जुनैदचा चित्रपट ‘महाराज’ थेट ओटीटीवर प्रदर्शित झाला. जुनैदचं त्याच्या भूमिकेसाठी खूप कौतुक झालं होतं. तर, खुशीचं पदार्पण फार खास राहिलं नव्हतं. ‘लव्हयापा’ हा चित्रपट ७ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होत आहे.