कैलाश खेर बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक आहेत. आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी लाखो लोकांच्या मनात जागा मिळवली आहे. गाण्याबरोबरच कैलाश खेर गोड आणि शांत स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र, सध्या कैलाश खेर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३’च्या उद्घाटन सोहळ्यातला असून कैलाश खेर समारंभातील आयोजकांना फटकारताना दिसत आहेत.
‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३’च्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी कैलाश खेर यांना बोलावले होते. मात्र वाहतूक कोंडीमुळे ते एक तास उशिराने कार्यक्रमस्थळी पोहोचले. झालेल्या गैरसोयीमुळे त्यांनी आयोजकांवर ताशेरे ओढले. वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे यायला उशीर झाला. आयोजकांनी यासाठी योग्य ती व्यवस्था करायला हवी होती, असे ते म्हणाले. तसेच, “तुम्ही स्मार्टनेस दाखवता, आधी शिष्टाचार शिका. तासभर थांबायला लावलं, हे खेलो इंडिया काय आहे? काम कसं करायचं ते कुणालाच कळत नाही,” असं म्हणत कैलाश खेर यांनी आयोजकांना चांगलंच फटकारलं.
‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे उद्धाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर कैलाश खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले, “खेळ आणि संगीत यांना एकत्र जोडण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमचे पंतप्रधान @narendramodi जी तुमचे आभार, देशात युगानुयुगे या दोन्ही क्षेत्रांना हलक्यातच घेतले जात आहे.”
‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३’ ही देशातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा मानली जाते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील बीबीडी विद्यापीठात २५ मे पासून या स्पर्धेस सुरुवात झाली आहे. तर ३ जून रोजी वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) या स्पर्धेचा समारोप होणार आहे.